मुंबई : उन्हामुळे तापलेल्या शरीराला गारवा मिळण्यासाठी तुम्ही शीतपेयांना पसंती देत असाल तर सावधान! मुंबईच्या रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या थंड पेयांमध्ये तब्बल 92 टक्क्यांपर्यंत ई कोलाय हा घातक जीवाणू आढळला आहे.

 

फेरीवाल्यांकडे असलेल्या पाण्यातही ई कोलायचं प्रमाण 26 टक्के आहे. हा जीवाणू सामान्यत: मानवी विष्ठेत आढळतो. ई कोलाय या जीवाणूच्या प्रादुर्भावामुळे गॅस्ट्रो, जुलाब यासारखे आजार होऊ शकतात.

 
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने हॉटेल्स, फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकानं, बर्फाचे गोळेवाले, लस्सी-ताक विक्रेते आणि फास्ट फूड सेंटर्स यांची पाहणी करुन हा निष्कर्ष काढला आहे.

 
ज्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आला, त्या सर्वांवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई केली जात आहे.