मुंबई : अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत मुंबईत 70 लाख रुपये किमतीचं ड्रग जप्त करण्यात आलं आहे. कांदिवली परिसरात झालेल्या कारवाईत एलएसडी जप्त करण्यात आलं असून पाच जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.


सुमारे 70 लाख रुपये किमतीचे एलएसडीचे 1400 डॉट जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे अटक झालेल्या पाच जणांमध्ये दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर एका खाजगी टीव्ही वाहिनीच्या पदाधिकाऱ्याचाही आरोपींमध्ये सहभाग आहे.

वीस वर्षांचा अरबाज ताज मोहम्मद खान हा विद्यार्थी या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. 26 वर्षांच्या चुलतभावाच्या मदतीने अरबाज ड्रग्जचा व्यापार करत असल्याचं वृत्त आहे.

एका खाजगी वाहिनीत असोसिएट प्रोड्युसर पदावर कार्यरत असणाऱ्या 20 वर्षीय युवकालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 24 वर्षीय विद्यार्थी आणि 24 वर्षीय इंजिनिअरलाही पोलिसांनी अटक केली आहे. एनडीपीएस कायद्याअंतर्गत आरोपींवर कारवाई करण्यात येत असून तीन एप्रिलपर्यंत त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.