मुंबई : मागील सहा महिन्यांचा विचार केला तर आज सोनं जवळपास 7 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. मार्च महिन्यानंतर सोन्याच्या किंमतीत झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे. या घसरणीसह पहिल्यांदाचं सोनं प्रति तोळा 50 हजारांखाली आलं आहे. सध्याचा सोन्याचा दर प्रति तोळा 49 हजार 595 जीएसटी सोडून तर जीएसटी धरून 51 हजार 083 रुपये इतका आहे. 7 ऑगस्टला सोनं प्रतितोळा 56 हजार 200 रुपये इतकं होतं. पण आता हाच दर 49 हजार रुपयांच्या घरात आला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलोला 58 हजार 583 रुपये झाले आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत वायदा बाजारातील दर 0.08 टक्क्यांनी म्हणजेच 1.40 डॉलरने घसरून 1 हजार 864. 90 डॉलर प्रति औस झाले आहे. त्याशिवाय सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत सध्या प्रति औस 1 हजार 861.11 प्रति डॉलर आहे.


याबाबत बोलताना पूना गाडगीळचे सीईओ अमित मोडक म्हणाले की, लवकरच अमेरिकेत अध्यक्षपदासाठी निवडणूक होतं आहे. या निवडणुकीत ट्रम्प यांना डॉलरचे मूल्य स्ट्रॉंग ठेवणं गरजेचं आहे तरच ते नागरिकांचा विश्वास येणाऱ्या निवडणुकीसाठी जिंकू शकतील. त्यामुळे ज्यावेळी करन्सी स्ट्रॉंग असते त्यावेळी आपोआपच सोन्याचे दर उतरतात. पुढील काही दिवसांसाठी हे दर आपल्याला अशाच प्रकारे असल्याचं पाहायला मिळेल. जर डॉलरची किंमत स्ट्रॉंग राहिली नाही तर याचा फटका ट्रम्प यांना बसू शकतो त्यामुळे ते कोणताही धोका पत्करतील असं वाटतं नाही.


याबाबत बोलताना मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या किंमतीत मंदी आल्यामुळे सोन्याचे भाव कमी झाल्याचं पाहिला मिळत आहे. पुढील काही दिवसांत पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात लग्नसराई, आणि दसरा दिवाळी सारखे सण देखील येतं आहेत त्यामुळे 6 हजार 800 रुपयांनी सोनं कमी होणं ही सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. जगभरात कोरोनाची लस बनवण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी सुरू असलेल्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात पोहचल्या आहेत. त्यामुळेच आता कुठं तरी दर कमी होतं असल्याचं चित्र आहे. परंतु देशभरात आगामी सण पाहता नागरिकांचा सोनं खरेदी करण्याकडे ओढा असल्याचं पाहिला मिळेल.