डोंबिवली : आपल्या सहयोगी नगरसेवकाच्या हत्येसाठी तब्बल एक कोटीची सुपारी दिल्याप्रकरणी डोंबिवलीतील भाजप नगरसेवक महेश पाटील याला आज (शुक्रवार) अटक करण्यात आली आहे.
महेश पाटील हा भाजपचा डोंबिवलीतील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नगरसेवक असून भाजपचं ग्रामीण जिल्हाध्यक्षपदही त्याच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडी-वाडा रोडवरील दरोड्याप्रकरणी पोलिसांनी काही दरोडेखोरांना अटक केली होती. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आल्याने चौकशी केली असता डोंबिवलीतील भाजप नगरसेवक महेश पाटील याने कल्याणचे भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची १ कोटीची सुपारी आपल्याला दिल्याची कबुली या दरोडेखोरांनी दिली होती.
या प्रकरणात महेश पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास महिनाभर तो फरार होता. या काळात उच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आज (शुक्रवार) आपल्या दोन साथीदारांसह तो कल्याण न्यायालयात हजर झाला. तिथे ठाणे खंडणीविरोधी पथकाने त्याला अटक केली.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात महेश पाटील यांच्यासह डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचाही हात असल्याचा संशय नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
नगरसेवकाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या भाजप नगरसेवकाला अटक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2018 08:38 PM (IST)
आपल्या सहयोगी नगरसेवकाच्या हत्येसाठी तब्बल एक कोटीची सुपारी दिल्याप्रकरणी डोंबिवलीतील भाजप नगरसेवक महेश पाटील याला आज (शुक्रवार) अटक करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -