मुंबई: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांची चर्चा सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सुरू आहे, पण सर्वांच्या नजरा आता होणाऱ्या मुंबईच्या महापौरपदावर लागल्या आहेत. गेल्या २८ वर्षांपासून बीएमसी ताब्यात घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (ठाकरे गटाचा) पराभव झाला आहे. मुंबईत पहिल्यांदाच (BMC Election 2026) भाजपला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, देशातील सर्वात जास्त मानल्या जाणाऱ्या बीएमसीचा महापौर कोण होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे? अशातच राज्यात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आज (BMC Election 2026) महापालिकेच्या रणनितीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत शेवाळे यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत पालिकेतील महापौर आणि महत्वाच्या समित्यावर वाटाघाटी केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या दिल्ली वारी अन् घडामोडींवरती मनसे नेते मनोज चव्हाण यांनी सडकून टीका केली आहे.(BMC Election 2026)
दिल्लीत बसुनी मुंबईचे तक्त ठरवितो कारभारी महाराष्ट्रचा
मनसे नेते मनोज चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आणि एकनाथ शिंदेंना टॅग करून म्हटलंय की, मुंबईच्या महापौर निवडीची चर्चा कुठे तर दिल्लीत मराठीच माणसाच्या मुंबईच्या प्रथम नागरिक दिल्लीत ठरणार काय शोकांतिका आहे. या आधी अशी स्थिती कधी झाली नव्हती, यावरून स्पष्ट होते महायुतीच्या राज्यातील नेत्यांचे वजन काय आहे…" दिल्लीचे आमिष मिळाले पंतना बदल्यात मराठी आणली अंताला", अशी पोस्ट चव्हाण यांनी केली आहे, तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये चव्हाण यांनी लिहलंय की, दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा, ही उक्ती आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी बदलून "दिल्लीत बसुनी मुंबईचे तक्त ठरवितो कारभारी महाराष्ट्रचा "असे केल्या बद्दल मराठी जनता आपले आभारच मानेल?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.(BMC Election 2026)
३० जानेवारीला भाजपचाच महापौर होणार
राज्यात एकीकडे अशा घडामोडी घडत असतानाच दुसरीकडे ३० जानेवारीला भाजपचाच महापौर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडणार नाही, ३० जानेवारीला भाजपचाच महापौर होईल अशी भाजप नेत्यांची माहिती आहे.
अनुकूल तडजोड साधण्याची रणनीती?
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर संख्याबळ भाजपच्या तुलनेत कमी असतानाही शिंदे गटाने सुरुवातीलाच महापौर पदावर दावा ठोकला आहे. प्रारंभी अडीच वर्षांचा कार्यकाळ मागण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हा दावा कमी करत एक वर्षावर आणण्यात आला आहे. 23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षास सुरुवात होत असल्याने, त्या कालावधीत शिवसेनेचाच महापौर असावा आणि ती बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल, असा युक्तिवाद शिंदे गटाकडून केला जात आहे.
महापौर पदाच्या मुद्यावर तणाव वाढल्यास इतर महत्त्वाची पदे आणि समित्या आपल्या वाट्याला करून घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही वाटाघाटींमध्ये आक्रमक भूमिका घेत शिंदे सहसा माघार घेत नाहीत, याचा अनुभव महायुतीला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची आर्थिक सूत्रे हातात असलेल्या स्थायी समितीसह सुधार, शिक्षण, बेस्ट आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवरही शिंदे गटाकडून दावा केला जाऊ शकतो. सुरुवातीला जास्त मागणी करून नंतर अनुकूल तडजोड साधण्याची रणनीती शिंदे गटाकडून पुन्हा वापरली जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
