मुंबई : आजपासून मुंबई विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पेपर देताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले असून अनेकांना आज परीक्षा देता आली नाही. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे आज परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी विद्यार्थ्यांनी मात्र यावर प्रचंड नाराजी दर्शवली आहे.
परीक्षेची लिंक स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप यावर परीक्षेच्या दिवशी उपलब्ध न झाल्याने नंतर काहींना ही लिंक उशीरा मिळल्याने परिक्षेसाठी लॉग इन होऊ शकले नाही. तर काही विद्यार्थ्याचे लॉग इन होऊन सुद्धा तांत्रिक अडचणीमुळे पेपर सबमिट करता आलेले नाही. तर अनेकांचे पेपरच एक्टिव्हेट होऊ शकले नाहीत. अशा अनेक तांत्रिक समस्या विद्यार्थ्यांना आल्याने पहिल्याच पेपरचा फज्जा उडाल्याचे चित्र समोर आले. याबाबत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी हेल्पलाइन नंबर सुद्धा कॉल करून विचारणा केली असता त्यांना परीक्षेदरम्यान काय अडचणी आल्यात याबाबत फॉर्म भरण्यास सांगितले आहे किंवा टेक्निकल टीमला ईमेल द्वारे माहिती देण्यास सांगितली आहे.
अनेक विद्यार्थी एक तर नवीन पॅटर्ननुसार ऑनलाइन परीक्षेबाबत चिंतेत असताना पहिल्याच पेपरला अशाप्रकारे गोंधळ उडल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना संयम बाळगण्यास सांगण्यात आला असून नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पुढील परीक्षा झाल्यानंतर या परीक्षेचे नियोजन कळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आला आहे.