मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडे मोठ्या घडामोडी घडत असून सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं चित्र दिसतंय. निधी वाटप, अनेक महत्त्वाचे निर्णय एकतर्फी बदलले जात असल्याची भावना असो किंवा निवडणुकांमधील जागावाटप असो, यावरून एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा आहे. तर विरोधक असलेले ठाकरे आणि फडणवीस यांच्यात जवळीक वाढल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेनेच्या जास्तीच्या जागांच्या मागणीबाबत एकही पाऊल मागे हटण्यास तयार नसताना, दुसरीकडे एकेकाळचे सहकारी राहिलेल्या ठाकरेंच्या पक्षातून आलेल्या एका फोन कॉलवर तातडीने पावलं उचलून त्यांनी मोठा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे.

Continues below advertisement

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेने आणलेल्या चार प्रस्तावांविरोधात, आदित्य ठाकरे आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या चारही प्रस्तावांना विरोध केला. त्यानंतर थेट मध्यरात्री मातोश्रीवरून मुख्यमंत्र्यांना फोन गेला. फडणवीसांनीही लागलीच प्रस्तावांचा सविस्तर अहवाल मागवला अन् प्रस्ताव मंजूर न करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. थोडक्यात, मातोश्री आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वाढलेला समन्वय, हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

नेमकं काय घडलं? 

1. सुधार समितीमध्ये मोकळ्या जागा, रुग्णालय, रक्तपेढ्या या कंत्राटीपद्धतीने देणाऱ्या प्रस्तावावर आदित्य ठाकरेंनी आक्षेप नोंदवला.2. आदित्य ठाकरे यांनी प्रस्तावावरील घेतलेले आक्षेप हे आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज करून माहिती दिली.3. मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या मेसेजवर मुख्यमंत्र्यांनी पहाटे रिप्लाय दिला. 4. सकाळी 11 वाजता सुधार समितीमध्ये आलेले हे सर्व प्रस्ताव पुनर्विचारासाठी पाठवण्यात आले. 5. प्रस्ताव पुनर्विचारासाठी पाठवण्यात आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आभार मानले. 6. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या सगळ्या प्रस्तावांच्या संदर्भात आदित्य ठाकरेंनीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना फोन करून माहिती दिली होती. मात्र दोन्ही नेत्यांनी तशी चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. 

Continues below advertisement

आदित्य ठाकरेंचा कोणत्या प्रस्तावांना विरोध?

- सेव्हन हिल्स रुग्णालयाचे खासगीकरण- पाच उपनगरीय रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचा पीपीपी प्रस्ताव- वांद्रे रेक्लमेशन येथील एक्झिबिशन सेंटर आणि मलबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचा प्रस्ताव.

दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याशी कुणीही संपर्क केला नाही, आपल्याला कोणताही फोन आला नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं.

ही बातमी वाचा: