ठाणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या तीन दिवसात मुंबईच्या आसपास असलेल्या महानगरपालिकांचा दौरा केला. आज मीरा-भाईंदर आणि शेवटी ठाणे महानगरपालिकेचा दौरा करून त्यांनी कोविड 19 च्या उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे सांगितले. अपुऱ्या आरोग्य सेवांमुळे रुग्ण संख्या वाढत असून बळींची संख्या देखील याच क्षेत्रात सर्वाधिक असल्याचे त्यांनी आकडेवारीसह सांगितले. यासोबतच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर विविध विषयांवर निशाणा साधला. मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांच्या गोंधळात राज्य सरकारमधील समन्वयाच्या अभावाबरोबरच मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांमधील अविश्वास उघड झाला असल्याची टीका त्यांनी केली. राज्य सरकारमधील प्रत्येक जण मीच प्रमुख असल्याच्या अविर्भावात असून, सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, अशी प्रखर टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.


तीन दिवसांच्या या दौर्‍यात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड तसेच भाजपचे स्थानिक आमदार आणि नेते होते. आज केलेल्या दौऱ्यात सुरुवातीला मीरा-भाईंदर महानगरपालिकेचा आढावा घेऊन नंतर ठाण्यातील भाईंदरपाडा येथील क्वॉरंटाईन सेंटर, ग्लोबल हब हॉस्पिटल येथे देवेंद्र फडणवीस यांनी भेटी दिल्या. नंतर ठाणे महापालिका आयुक्तांबरोबर चर्चा केली.


आढावा दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांची माहिती पोलिस आयुक्तांकडून गृहमंत्र्यांना दिली जाते. गृहमंत्री व मुख्यमंत्री वेगवेगळे असल्यास गृहमंत्र्यांकडून ती मुख्यमंत्र्यांना देण्याचे अपेक्षित आहे. मात्र, या बदल्यांची माहिती दिली नसल्याचे लक्षात आल्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून बदल्या थांबवण्यात आल्या. मुख्यमंत्र्यांचा विश्वास आहे, म्हणून मंत्रिमंडळात मंत्री आहेत. पण या प्रकरणात समन्वयाचा पूर्णपणे अभाव असल्याबरोबरच मंत्र्यांमधील अविश्वासही उघड झाला. मुख्यमंत्री-मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. या सरकारमध्ये कधी मंत्री, कधी सचिव, तर कधी अधिकारी निर्णय जाहीर करतात. काही वेळा मुख्यमंत्र्यांकडून थेट निर्णय घेतले जातात. प्रत्येकजण मीच प्रमुख असल्याच्या अविर्भावात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.


संजय राऊत लेख लिहून कोरोनाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करतात


संजय राऊत यांच्या सरकार पाडण्याच्या विधानावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. राज्य सरकारचे अपयश झाकण्यासाठी संजय राऊत यांच्याकडून कपोलकल्पित सरकार पडण्याचा प्रयत्न असल्याचे लेख लिहून कोरोनाच्या विषयावरून जनतेचे लक्ष विचलित केले जाते. भाजपाला सरकार पाडण्याची कोणतीही घाई नसून, सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असे भाकितही देवेंद्र फडणवीस यांनी केले.


सारथी संस्था बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न


मराठा आरक्षण हा मुद्दा राजकारणापलीकडे असून, मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने सजग राहून प्रयत्न करावा. सारथी संस्था पद्धतशीरपणे खिळखिळी करून बंद करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. एखाद्या व्यक्तीने योग्य सूचना दिल्यावर तो भाजपचा, चूक लक्षात आणून दिल्यास, तो भाजपचा, अशी ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकार येतील, जातील. पण संस्था टिकल्या पाहिजेत, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.


एमएमआर क्षेत्रात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. जास्तीत जास्त टेस्टिंग कराव्या, अद्ययावत सुविधांचा लाभ घ्यावा, राज्य सरकार आणि महानगरपालिका यामध्ये समन्वय असावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महानगरपालिकांना राज्य सरकारने सहाय्य करावे, व्हेंटिलेटर, आयसीयू अशा सुविधा राज्यसरकारने पुरवाव्या, टेस्ट केल्यानंतर 24 तासांच्या आत रिपोर्ट प्राप्त व्हावे त्यासाठी प्रायव्हेटची मदत घ्यावी, अशा अनेक सूचना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला केल्या.


Devendra Fadnavis PC | Thane | ...म्हणून मुख्यमंत्र्यांनी बदल्यांना स्थगिती दिली : देवेंद्र फडणवीस