मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि परकीय चलन वाचवण्याचे आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्रातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत इंधन बचत, ऊर्जा संवर्धन आणि शासकीय खर्चात काटकसर करण्यासाठी विविध उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
या निर्णयांनुसार मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तत्काळ प्रभावाने अर्ध्यावर आणण्यात येणार आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द करण्यात आले असून, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Maharashtra Ministers Convoy Reduction : मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या
मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाहेरच्या दौऱ्यांदरम्यान निर्धारित संख्येपेक्षा अधिक वाहने ताफ्यात नसतील, याची जबाबदारी संबंधित पोलिस आयुक्त किंवा पोलिस अधीक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
Maharashtra Foreign Tours Cancelled : परदेश दौरे आणि अभ्यास दौऱ्यांवर बंदी
मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोणतेही परदेश दौरे न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अभ्यास दौरे आणि शासकीय कामांसाठी होणारे अनावश्यक प्रवासही रद्द करण्यास सांगण्यात आलं आहे.
Maharashtra Public Transport : सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणार
मंत्री आणि अधिकाऱ्यांनी मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा. पहिल्या टप्प्यात किमान एक दिवस सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून हा प्रयोग राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
Video Conferencing Meetings : बहुतेक बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे
अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष बैठकीसाठी बोलावण्याऐवजी शक्य तितक्या बैठका या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे प्रवास खर्च आणि इंधन वापरात बचत होणार आहे.
Maharashtra Energy Saving : ऊर्जा बचतीसाठी अतिरिक्त उपाययोजना
अनावश्यक होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवरील कारवाई वाढवून डेकोरेटिव्ह लायटिंगचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे. शासनाकडून वितरित वाहनांचाही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.
PM Modi Appeal : पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि परकीय चलन वाचवण्यासाठी, आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी करण्याची आणि नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे महत्त्वाचे आवाहन केलं आहे. स्वत: पंतप्रधान मोदी बुधवारी आपल्या सोळा ते वीस गाड्यांच्या ताफ्याऐवजी, अवघ्या दोन गाड्यांच्या ताफ्यात दिसले. तर इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यातही निम्म्याने कपात झाली आहे.
केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या ताफ्यात देखील निम्म्याने कपात झाली आहे. तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक कारचा वापर करत, ताफ्यातील गाड्याही निम्म्या केल्या आहेत.
ही बातमी वाचा:
