मुंबई : आपल्या शरीरात कॅन्सरपेशी आहेत का? असल्यास, त्या किती प्रमाणात आहेत? हे आता आपल्याला अवघ्या काही मिनिटात कळू शकणार आहे. मुंबई आयआयटीतील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक चंद्रमाऊली सुब्रम्हण्यम आणि रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी मिळून हे संशोधन केलं आहे. याद्वारे आपण आपल्या कॅन्सर पेशींची तपासणी करु शकतो.
आपण श्वास बाहेर सोडतो, त्यावेळी इन्फेक्शन असलेले अनेक लहान कण बाहेर पडतात. अशा कणांना रमन स्पेक्ट्रोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साह्याने एका नॅनो पार्टीकल असलेल्या मिश्रणात विरघळवून ही प्रक्रिया केली जाते. यानंतर रक्त तपासणीप्रमाणे काही मिनिटात आपल्या शरीरातील कॅन्सर पेशींबाबत कळू शकणार आहे.
कॅन्सर पहिल्या स्टेजला असताना समजत नसल्याचं बऱ्याचदा आढळून आल्यानंतर या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पहिल्या स्टेजमध्येच कॅन्सरचं निदान होऊ शकणार आहे. हे निदान झाल्याने रुग्णाला त्वरित उपचार करता येतील आणि पुढील त्रास टाळता येईल, असं प्राध्यापक सी. सुब्रम्हण्यम यांनी सांगितलं.
याशिवाय, हे तंत्रज्ञान रुग्णालयात कसं लवकरात लवकर आणता येईल, याचे प्रयत्न सुरु असून अगदी 15 ते 20 रुपयांमध्ये काही मिनिटात आपण कॅन्सर पेशीची तपासणी करु शकणार आहोत. तसंच या रमन स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे आपण वायू प्रदूषणाची पातळी सुद्धा समजू शकणार आहोत. शिवाय, स्फोटक शोधण्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो.