Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) शिवसेना (Shiv Sena) आणि शिंदे गट (CM Eknath Shinde) यांच्यात चढाओढ सुरु असल्याचं दिसतंय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदे गटानं पक्षाच्या गटनेते पदापासून ते अगदी पक्ष चिन्हापर्यंत दावा केला. आता शिंदे गट शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक करण्यातच्या प्रयत्नात आहे. यासर्व घडामोडींविरोधात शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयाचं (High Court) दार ठोठावलं होतं. आज या प्रकरणावर सुनावणी पार पडणार होती. पण ही सुनावणी उद्यापर्यंत (शुक्रवार) तहकूब करण्यात आली आहे. 


शिवसेनेच्या वतीनं दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील आज सुनावणी होणार होती. पण आता ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच, शुक्रवारी सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. याचिकाकर्ते म्हणजेच, शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आस्पी चिनॉय यांनी न्यायालयात याचिकेत सुधारणेसाठी वेळ मागितला. न्यायालयानं शिवसेनेची ही विनंती मान्य करत याप्रकरणावरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब केली. 


शिवसेनेच्या वतीनं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आस्पी चिनॉय यांनी न्यायालयात विनंती केली की, "महापालिकेच्या वतीनं आमच्या विनंती अर्जाला (दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी केलेल्या अर्जाला) उत्तर दिलेलं आहे. ज्यावेळी आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, तोपर्यंत विनंती अर्जाला महापालिकेकडून कोणतंही उत्तर मिळालेलं नव्हतं. पण आता कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महापालिकेकडून आमची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आम्हाला या याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी देण्यात यावी."


मुंबई महापालिकेच्या वतीनं शिवसेनेनं केलेल्या सुधारणा करण्याच्या विनंतीला विरोध करण्यात आला. त्यांचं असं म्हणणं होतं की, सुधारणा करण्याऐवजी याचिकाकर्त्यांनी एक स्वतंत्र याचिका दाखल करावी. म्हणजे, त्याला उत्तर देणं आम्हालाही सोपं जाईल. कारण आम्हाला त्या याचिकेची प्रत मिळणं गरजेचं आहे. त्यानंतरच आम्ही आमचा युक्तिवाद तयार करु. दोन्ही बाजूच्या वकिलांच्या विनंतीवरुन आज दुपारी अडीच वाजता ही सुनावणी पार पडणार होती. पण काही वकिलांच्या अनुपलब्धतेमुळे ही सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :