मुंबई : मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाचे उपअधीक्षक प्रकाश जाधव यांनी स्वत:च्या मुलाच्या मालकीच्या 'एपीटी अॅडव्हरटायझिंग कंपनी'ला अवैधरित्या होर्डिंगचे परवाने देऊन फायदा मिळवून दिल्याचा आरोप स्थायी समितीत केला आहे. उपअधीक्षक प्रकाश जाधव यांचा मुलगा प्रतिक जाधव हा एपीटी अॅडव्हरटायझिंग कंपनीत भागीदार आहे.

या कंपनीने मुंबईतील विक्रोळी, अंधेरी, बीकेसी आणि इतर ठिकाणी एकूण 32 जागांवर होर्डिंगसाठी करार केलेले आहेत. या कंपनीचा भागीदार प्रतिक जाधव हा परवाना विभागाचे उपअधीक्षक प्रकाश जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे खुद्द होर्डिंगला परवाना देण्याचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्याने मुंबईत अनधिकृत होर्डिंगला वरदहस्त दिला आहे, असा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेता रवी राजा यांनी केला आहे.

यासंदर्भात माहिती सादर करण्याचे आदेश स्थायी समितीत देण्यात आले आहेत. मात्र, या प्रकरणी आपल्याला नाहक गोवण्यात येतंय, एपीटी कंपनीचे होर्डिंग मुंबईत नाहीच, असा दावा उपअधीक्षक प्रकाश जाधव यांनी केला आहे. "माझं प्रमोशन रोखण्यासाठीचं हे कारस्थान असून, मी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे", असे जाधव यांनी सांगितले आहे.