दादर: मुंबईतील कबुतरखान्यावरुन (Kabutar Khana) दोन दिवसांपूर्वी जैन समाज आक्रमक झाला होता. जैन समाजाने बुधवारी 6 ऑगस्ट दादर कबुतरखाना (Dadar Kabutar Khana) परिसरात मोठं आंदोलन करत ताडपत्री फाडून टाकली. यावेळी जैन आंदोलकांनी ताडपत्री, बांबूंना लावलेल्या सुतळी तोडल्या. ताडपत्री हटवून आंदोलकांनी कबुतरखाना पुन्हा सुरू केला. लगेच धान्य टाकून कबुतरांना आंदोलकांनी खाद्य दिलं. जवळपास तासभर हे आंदोलन सुरू होतं. दरम्यान याच विषयावर बोट ठेवत चित्रा वाघ यांनी ज्या मंदीरासमोर आंदोलन झाले तिथेही जाळ्या लावल्या आहेत. या कबूतरांच्या विष्ठेचा त्रास जात-धर्म बघून होतं नाही. जैन मंदीराने जाळ्या काढाव्यात, कबुतरांना आत घ्या, येऊदेत मंदीरात, असं म्हटलं होतं, त्यानंतर आज दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला जाळ्या का लावल्या आहेत याचं कारण अखेर सांगण्यात आलं आहे.
म्हणून जैन मंदिरात जाळी लावली...
एबीपी माझाशी बोलताना जैन व्यक्तीने सांगितले की, कबुतरे आत मंदिरात येतात म्हणून या जाळ्या लावलेल्या नाहीत, तर मंदिरामध्ये पंखे आहेत, पंखे सुरू असतात, त्या पंख्यांमध्ये अडकून एखाद्याचा पक्षाचा जीव जाऊ नये, म्हणून जाळ्या लावलेल्या आहेत, त्या जाळ्या उलट पक्षांचा जीव वाचवण्यासाठी लावलेल्या आहेत. याच दुसरं कोणतंही कारण नाही, मानवी आरोग्य चांगलं राहावं हे मान्य आहे, मात्र त्यांना उपाशी मारावं हे चुकीचं आहे, असं एका जैन बांधवाने सांगितलं.
तर दादरमध्ये असलेल्या कबुतरखान्याच्या आसपास राहणाऱ्या काही महिलांनी सांगितलं की, तो जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, कबुतरखाने असावेत पणते शहरांच्या मध्यवर्ती भागामध्ये नसावेत, ते ज्या ठिकाणी कमी लोकवस्ती आहे, अशा ठिकाणी ते असावेत, कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे, आम्हाला तो मान्य देखील आहे, कबुतरांमुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. ते घराच्या खिडक्यांवरती आणि एसीच्या पंख्यावरती घाण करतात, त्यांच्यामुळे आरोग्याला देखील धोका पोहोचतो, त्यामुळे हे कबुतरखाने या ठिकाणाहून हलवावेत असं आम्हाला वाटतं असं दादरच्या कबुतरखाना परिसरातील महिलांनी म्हटलं आहे.
दादरमधील कबुतरखान्याच्या समोरील जैन मंदिराला कबुतरांमुळे त्रास होऊ नये, ते मंदिरात येऊन घाण करू नयेत म्हणून जाळ्या लावण्यात आल्या आहेत, असं काहींनी म्हटलं होतं. कबुतरांमुळे मंदिराच्या स्वच्छतेला बाधा येत होती, त्यामुळे ही जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला, यावर बोलताना एका जैन बांधवाने म्हटलं की, मंदिराच्या आतमध्ये असलेल्या पंख्यामुळे त्यांचा जीव जाऊ नये म्हणून तिथे जाळ्या लावलेल्या आहेत. इतर कोणत्या ठिकाणी किंवा आमच्या दुकानामध्ये पंखा नसल्यामुळे जाळी लावलेली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.