Continues below advertisement

मुंबई : दादरच्या चैत्यभूमीला (Dadar Chaitya Bhoomi) जाण्यासाठी निघालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ अडवून धरल्याने मोठा गोंधळ झाल्याचं दिसून येतंय. भीम अनुयायी हे रिक्षातून चैत्यभूमीकडे निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवून धरले. आम्ही दरवर्षी या ठिकाणी रिक्षाने येतो, पण याच वर्षी आम्हाला अडवलं जात असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला. त्यानंतर पोलीस आणि भीम अनुयायांमध्ये काहीसा वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ भीम अनुयायांनी रस्ता रोखून धरला आहे. त्यामुळे दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. आंबेडकरी अनुयायांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर रस्ता रोखला आहे. तुर्भेवरून दादर चौत्यभूमीला जाण्यासाठी रिक्षातून अनुयायी आले आहेत, त्यांना सायन पुढे जाऊ दिले जात नाही. पोलिसांनी या सर्व रिक्षा रोखून धरल्या आहेत.

Continues below advertisement

Dadar News : आधी का सांगितलं नाही, अनुयायांची तक्रार

चुनाभट्टी सायन कनेक्टरजवळ रिक्षांना वाहतुकीसाठी परवानगी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे आंबेडकर अनुयायी चांगलेच भडकल्याचं दिसून आलं. आम्ही दरवर्षी या ठिकाणाहून रिक्षाने दादरला जातो. पण यंदा आम्हाला अडवलं जात आहे. या आधी आम्हाला याची माहिती का दिली नाही अशी तक्रार अनुयायांनी केली. ऐनवेळी पोलीस सांगतात की या रस्त्यावरून तुम्हाला जाता येणार नाही अशीही तक्रार अनुयायांनी केली.

पोलिसांनी विरोध केल्यानंतरही अनुयायांनी रिक्षा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी अनेक रिक्षा अडवल्या. त्यामुळे मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर गर्दी दिसून आली. यावेळी अनुयायी आणि पोलिसांमध्ये शाब्दीक वार झाल्याचं दिसून आलं.

Mumbai Indu Mill Smarak : इंदु मिल स्मारकाचे 50 टक्के काम पूर्ण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेत साकारले जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिल येथील स्मारक कधी होणार हा प्रश्न सतत विचारला जातोय. पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचं स्ट्रक्चर उभारण्याचे नियोजन आहे तर पुतळ्याच्या उभारणीत अडचणीं न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण होऊ शकणार आहे, असे स्मारक समितीकडून सांगण्यात येत आहे

सध्या स्मारकाचे 50 टक्के काम झाले असून पुतळ्याची उभारणी हे प्रकल्पातील आव्हान आहे शंभर फुटाचा पायथा आणि 350 फूट उंच पुतळा असे एकंदरीत भव्य स्मारक असणार आहे.