मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT Station) येथे मोठा रेल्वे अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरहून येणारी फास्ट लोकल (Badlapur Fast Local) नियोजित 4 नंबर प्लॅटफॉर्मऐवजी अचानक 5 नंबर प्लॅटफॉर्मकडे वळू लागली, पण त्या प्लॅटफॉर्मवर आधीच एक लोकल उभी होती. समोरच दुसरी लोकल उभी असल्याचे लक्षात येताच येणाऱ्या लोकलच्या मोटरमनने प्रसंगावधान राखत तात्काळ ब्रेक लावले. दोन्ही गाड्यांमध्ये केवळ एका डब्याएवढे अंतर शिल्लक राहिले होते. मोटरमनच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Continues below advertisement

CSMT Railway Incident : ट्रॅक बदलामुळे निर्माण झाला धोका

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. बदलापूरहून आलेली लोकल मागे घेण्यात आली, तर 5 नंबर प्लॅटफॉर्मवरील लोकलला दुसऱ्या ट्रॅकवरून पुढे पाठवण्यात आले. त्यानंतर संबंधित लोकलला योग्य प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. मात्र या प्रकारामुळे काही काळ स्थानकावरील रेल्वे हालचालींवर परिणाम झाला.

CSMT Train Disruption : लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत

या घटनेमुळे सीएसएमटी स्थानकावरील 5 ते 8 क्रमांकाचे प्लॅटफॉर्म काही काळ बंद ठेवण्यात आले. दुपारी 3.18 वाजल्यापासून लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला असून अनेक गाड्या उशिराने धावत होत्या.

Continues below advertisement

Mumbai Local Technical Failure : यंत्रणेत बिघाडाचा संशय

अशा प्रकारची घटना अत्यंत दुर्मिळ असून सिग्नल प्रणाली किंवा ट्रॅक कंट्रोल यंत्रणेत बिघाड झाल्याशिवाय अशी परिस्थिती निर्माण होत नाही. म्हणूनच या घटनेमागे तांत्रिक बिघाड असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Series of Issues : एका दिवसात तिसरा बिघाड

महत्त्वाचे म्हणजे, मंगळवारी दिवसभरात रेल्वे व्यवस्थेत हा तिसरा बिघाड नोंदवण्यात आला आहे. पहाटे खर्डी (Khardi Station) स्थानकात घेण्यात आलेला ब्लॉक नियोजित वेळेपेक्षा दुप्पट काळ चालला. त्यानंतर डोंबिवली (Dombivli Station) स्थानकात ज्या ठिकाणी रेल्वे डबा घसरला होता त्या ठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 8.05 ते 8.35 या वेळेत ब्लॉक असणार होता, मात्र मशिनरी हटवण्यास उशीर झाल्याने तो सव्वा 9 वाजेपर्यंत वाढला.

Passenger Impact : प्रवाशांचे हाल, वेळापत्रक कोलमडले

या सलग बिघाडांमुळे सकाळपासूनच लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच सीएसएमटीतील या गंभीर घटनेमुळे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. प्रवाशांना गर्दी, उशीर आणि गैरसोयीचा सामना करावा लागला असून रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

ही बातमी वाचा: