Mumbai Cruise Drugs Case : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात सेटलमेंट करण्यासाठी 25 कोटींची मागणी केल्याचा दावा करणाऱ्या प्रभाकर साईलनं रात्री मुंबई पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला. मुंबई पोलिसांचे झोन वनच्या डिसीपींच्या ऑफिसमध्ये प्रभाकर साईल मंगळवारी संध्याकाळी 7 वाजता पोहोचले होते. त्यानंतर जवळपास 8 तासांपर्यंत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. प्रभाकर सईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे. तर दुसरा साक्षीदार असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. 


प्रभाकर सईल यांचा दावा आहे की, मुंबई ड्रग केस प्रकरणात सेटलमेंटसाठी 25 कोटी रुपयांच्या डीलबाबत ऐकलं होतं. त्यानंतर 18 कोटी रुपयांची डील फायनल होणार होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते. किरण गोसावी पेशानं गुप्तहेर आहे आणि ड्रग्ज केस प्रकरणातील पंचही आहे. प्रभाकर सईलनं माध्यमांसमोर येऊन केलेल्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर किरण गोसावी फरार आहे. प्रभाकरचं म्हणणं आहे की, जेव्हापासून त्यांनी या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर आणलं आहे, तेव्हापासून गोसावी फरार आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे. 


प्रभाकर यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सॅम डिसूझा नावाच्या एका व्यक्तीचाही उल्लेख केला आहे. प्रभाकरनं दिलेल्या माहितीनुसार, सॅम डिसूझाशी त्यांची भेट एनसीबीच्या ऑफिसबाहेर झाली होती. त्यावेळी ते केपी गोसावीला भेटण्यासाठी गेले होते. दोघेही एनसीबी ऑफिसमधून लोअर परेलमध्ये बिग बाजारजवळ गाडीनं गेले होते. अॅफिडेविटमध्ये दावा करण्यात आला आहे की, गोसावीनं सॅम नावाच्या व्यक्तीशी फोनवर 25 कोटी रुपयांपासून बोलणं सुरु करुन 18 कोटी रुपयांमध्ये डिल फायनल केली होती. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात आले होते. 


दरम्यान, एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात क्रूझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी केली जात आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरही आरोपी अटकेत आहेत. 


प्रभाकर साईल यांच्यावर प्रोफाईल फोटोचा दुरूपयोग केल्याचा आरोप


मुंबई क्रुज ड्रगप्रकरणात साक्षीदार (Mumbai Drug Case) असलेल्या किरण गोसावी ह्याचा खाजगी बॉडीगार्ड प्रभाकर साईल ह्यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी मागितलेल्या 25 कोटीतील 38 लाख आपण ज्या सॅम डिसुझा नामक व्यक्तीला दिल्याचे सांगून त्याचा फोटो एका चॅनलमध्ये दाखविला होता. तो फोटो असणारी व्यक्ती ही पालघरमधील हेनिक बाफना आहे. प्रभाकर साईल यांनी आपल्या प्रोफाइल फोटो दुरुपयोग केल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. तसेच या प्रकरणाचा आपला कुठलाही संबंध नसल्याने प्रभाकरवर कारवाई करण्याची लेखी तक्रार पालघर पोलीस अधिक्षकाकडे केली आहे.


क्रूझ ड्रग्स प्रकरणाला नवं वळण?


प्रभाकरने आपल्या मोबाईलमध्ये दाखवलेला सॅम नामक व्यक्तीचा फोटो हा पालघरमधील एक व्यापारी हेनिक बाफना यांचा आहे. मी प्रभाकर साईल यांना दोन महिन्यापूर्वी व्यवसायानिमित्त भेटलो होतो. मात्र, माझा त्याच्याशी कुठलाही व्यवहार झाला नाही, असा तक्रारी अर्ज संबंधित व्यक्तीने पोलीस अधिक्षकाकडे दिला. माझा प्रोफाइलवरील फोटो आणि माझ्या मोबाईल नंबरचा आधार घेत माझे सॅम नाव सांगून मला 38 लाख रुपये दिल्याची माहिती प्रसारित करून प्रभाकर साईल माझी बदनामी करीत असल्याचे बाफना यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे. माझी बदनामी करणाऱ्या प्रभाकर यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी या अर्जातून करण्यात आली. आरोपी किरण गोसावी हा पालघर जिल्ह्यातील मनोर येथील रहिवासी असून त्याचे पालघरमध्ये अनेक वेळा फेऱ्या मारल्याची माहिती पुढे येत असून त्याचा अनेक लोकांशी व्यवहार झाल्याची चर्चा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :