पालघर : कोरोना व्हायरसबाबत महाराष्ट्र सरकार अतिशय क्रियाशील पद्धतीने संपूर्ण परिस्थिती हाताळत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे जनतेला योग्य मार्गदर्शनपर सुचना करत आहेत, असे असतानाच पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जमावबंदीचा आदेश झुगारून आणि बेकायदेशीर रित्या प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता कोरोना विषाणू तपासणीचे आरोग्य शिबीर घेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गरीब जनतेला सेवा देणे हा उद्देश जरी चांगला असला, तरी सध्याची परिस्थिती पाहता हा प्रकार गंभीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
शिबीर घेतल्याची माहिती दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिकच्या फेसबुक पेजवरच देण्यात आली होती. दर्शिल होमिओपॅथीक क्लिनिक आणि त्रिमूर्ती रोडवेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरासाठी आरोग्य विभागाकडून पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचंही समोर आलं आहे. शिबीर जरी पूर्वनियोजित असले तरी आरोग्य शिबिर हे रद्द करता येत नव्हते का? सामान्यांच्या जीवाशी खेळ का मांडला? असे संतप्त सवाल आता नागरिकांमधून पुढे येत आहेत. शिबिरात दर्शन होमिओपॅथी क्लिनिकचे तज्ज्ञ डॉक्टरही उपस्थित होते.
Majha Vishesh | Coronavirus | युद्ध आमुचे सुरु! वाद विसरा... राजकीय एकी दाखवा.. कोरोनाला हरवा
सदर आरोग्य शिबीराचे आयोजन करून करण्यात आलेल्या हलगर्जी पणाची दखल घेत सदर शिबिराबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयोजकांवर जमावबंदी आदेशानुसार, कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी यांनी सांगितलं आहे. तसेच, पालघर जिल्ह्यामध्ये सध्या मनाई आदेश लागू केला असल्याने कोरोना व्हायरसबाबत खाजगी शिबीर घेऊन अश्या प्रकारे तपासणी करणं चुकीचं असून संबंधित प्रकरणाची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला असल्याचं पालघर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सुर्यवंशी यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | राज्यात 52 कोरोनाबाधित, पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर : राजेश टोपे