(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | राज्यात 52 कोरोनाबाधित, पाच जण डिस्चार्जच्या मार्गावर : राजेश टोपे
राज्यात आणखी तीन जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवड, पुणे आणि मुंबईत प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये आज आणखी तीन जणांची भर पडली आहे. राज्यात सध्या 52 कोरोनाबाधित असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तीन नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील कोरोनासंदर्भातील सद्यपरिस्थितीची माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे या 52 पैकी पाच जण डिस्चार्ज मिळण्याच्या मार्गावर असल्याचंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी साडेबारा वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार असून या ते काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह, डिस्चार्जच्या मार्गावर कोरोनाबाधित जे रुग्ण दाखल झाले होते, उपचारानंतर या पाच जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे या पाच जणांना आज डिस्चार्ज दिला जाईल. याचाच अर्थ रुग्ण बरा होतो. मात्र त्यांना सात ते आठ दिवस विलगीकरणात राहावं लागेल, असं आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केलं. तसंच आपण लॅब टेस्टिंगची संख्या दिवसाला 2400 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या आपण सहा लॅबमध्ये तपासणी करत आहोत, येत्या काही दिवसात ही संख्या 12 होईल, असं त्यांनी सांगितलं.
जनता कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद द्या : राजेश टोपे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला राज्यातील जनतेने 100 टक्के प्रतिसाद द्यावा असं राजेश टोपे यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "पंतप्रधानांचं भाषण ऐकलं. त्यांनी 22 मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं. हा योग्य निर्णय आहे. लोकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्फ्यू पाळायला हवा. तसंच गर्दी कमी व्हावी म्हणून यासाठी आम्ही दुपारी साडे बारा वाजता फेसबुक लाईव्ह माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधणार आहे. तेव्हा महत्त्वाचे निर्णय जाहीर करणार आहोत."
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. आम्ही वर्षा बंगल्यावरुन चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील समस्या आम्ही पंतप्रधानांसमो मांडणार आहोत. ते सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करतील, अशी माहिती टोपे यांनी दिली.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पुणे - 21 मुंबई - 12 नागपूर - 4 यवतमाळ - 3 कल्याण - 3 नवी मुंबई - 3 रायगड - 1 ठाणे - 1 अहमदनगर - 2 औरंगाबाद - 1 रत्नागिरी- 1
Majha Katta | Rajesh Topes | Coronavirus | लोकांनी ऐकलं नाही तर कुठल्याही क्षणी लॉकडाऊन : राजेश टोपे