Coronavirus Mumbai Update : चीन, अमेरिकेतील कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकानंतर भारत सरकार अलर्ट झालं आहे. विविध राज्यात देखील खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये (Mumbai) सुद्धा विशेष नियोजन आणि तयारीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये सध्या दोन रुग्णालयात कोविड वॉर्ड (Covid Ward) सुरु आहेत ज्यामध्ये सेंट जॉर्ज आणि सेव्हन हिल रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्यास आणि रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडल्यास त्याच्यावर या दोन रुग्णालयात उपचार केले जात आहेत.


मुंबईमध्ये सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 37 असून त्यातील सात कोरोना रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. काल झालेल्या बैठकीनंतर मुंबईतील सर्व सरकारी रुग्णालयांना कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास तयार राहण्याचे आणि तशा प्रकारचे नियोजन करण्याचे सूचना दिल्या आहेत.


काय आहेत सूचना? 



  • रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णाचे सॅम्पल जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवावे

  • कोरोना रुग्ण संख्या वाढल्यास त्यासाठी औषध पुरवठा तयार ठेवावा

  • त्यासोबतच सामान्य, ऑक्सिजन बेड सुद्धा तयार असावेत

  • लक्षणे असल्यास कोरोना चाचणी करणे आणि गाईडलाईन्सनुसार लसीकरण सुरु ठेवणे 


घाबरु नका, खबरदारी घ्या


मुंबईची सध्या स्थिती पाहता नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भावासंदर्भात घाबरुन जाण्याची गरज नाही. योग्य ती खबरदारी घेऊन गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि लक्षणे दिसल्यास कोरोना चाचणी करावी, जेणेकरुन आपली स्वतःची काळजी घेतली जाईल.


मुंबईत सध्या बेड्सची स्थिती


एकूण बेडस - 4450 
आयसीयू बेडस - 902
व्हेंटिलेटर - 544
ऑक्सिजन बेडस- 2154
रुग्णालयात दाखल रुग्ण - 7 


पंतप्रधान मोदी आज उच्चस्तरीय बैठक घेणार


कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाला आहे. चीनपासून जपान आणि अमेरिकेपर्यंत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. याबाबत आता भारत सरकारही अलर्ट मोडवर आलं आहे. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (22 डिसेंबर) उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. दुपारी ही बैठक होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. एका अहवालानुसार, Omicron चं सब-व्हेरियंट BF.7 हे चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होत असलेल्या वाढीमागील प्रमुख कारण आहे. या सब-व्हेरियंटमुळे आता भारत सरकारचीही चिंता वाढली आहे. भारतात आतापर्यंत BF.7 ची चार प्रकरणं आढळून आली आहेत. गुजरात आणि ओदिशात प्रत्येकी 2 प्रकरणं समोर आली आहेत.