मुंबई : मुंबईजवळ समुद्रात एक जहाज मागील 21 दिवसांपासून मुंबईच्या किनाऱ्यावर येण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. या जहाजात तब्बल 132 कर्मचारी आहेत. त्यांना पुन्हा भारतात परतायचं आहे. परंतु या जहाजाला अद्याप भारत सरकारकडून परवानगी न मिळाल्यामुळे हे जहाज समुद्रात अडकून पडले आहेत. या जहाजातील विद्याधर विलास पोळ या तरुणाने ही माहिती देणारा एक व्हिडीओ देखील तयार केला आहे. जो सोशल मीडियात चांगलाचं व्हायरल होतोय.


दुसरी महत्त्वाची बाब यामध्ये एकूण 35 मुंबईकर आहेत. या सर्वांचं म्हणणं आहे कि, आम्हांला कोरोनाची लागण झालेली नाही. सध्या जहाजावर आमची दररोज सकाळी डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी होतं आहे. त्यामध्ये अद्याप कोणीही कोरोना पॉझिटिव्ह सापडलेलं नाही. मागील 21 दिवसांपासून मुंबई जवळच्या समुद्रात थांबलेलं हे जहाज आता पुढील 2 दिवसात युरोपच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे आम्हाला भारतात येता येणार नाही. आम्हाला जहाजातून युरोपला जावं लागेल. सध्या जगातील अनेक देशात लॉकडाऊन आहे. अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानं वाहतूक बंद आहे. भारतातील देखील विमानं वाहतूक बंद आहे. त्यामुळे आमच्यावर युरोपात अडकून रहायची वेळ येईल, असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.

याबाबत बोलताना विद्याधर पोळ म्हणाले की, आम्ही 21 सप्टेंबरला जहाजात गेलो होतो. आमचे जहाज प्रवाशी जहाज आहे. आम्ही श्रीलंका-कोचीन असा प्रवास करून आता मुंबईच्या समुद्र किनारी येण्याच्या प्रतिक्षेत आहोत. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचं सावट आहे. त्यामुळे आमच्या जहाजाला मुंबईत येण्यास परवानगी मिळत नाहीए. परंतु आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. जर पुढील 2 दिवसांत आम्हाला मुंबईत येण्याची परवानगी मिळाली नाही तर आम्हाला देखील जहाजासोबत युरोपला जाव लागेल.

सध्या लॉकडाऊन मुळे अनेक ठिकाणी विमानसेवा बंद आहे. त्यामुळे आम्हाला पुन्हा भारतात येण्यासाठी प्रचंड अडचणीचा सामना करावा लागेल. आमची जहाजावर सर्व व्यवस्थित सुविधा आहे. परंतु आमच्यातील अनेकांच्या घरी अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आम्हाला कुटुंबीयांसोबत असणं महत्त्वाचं आहे. आम्हाला मुंबईत येऊ दिल्यास आम्ही क्वॉरंटाईन होण्यास देखील तयार आहोत, असं पोळ यांनी सांगितलं.