मुंबई : कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी शनिवारी राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत ज्या सोफिटेल हॉटेलमध्ये हे आमदार थांबले आहेत, तेथे महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली.


कर्नाटकातील काँग्रेसच्या आमदारांनी दिलेला राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी या कार्याकर्त्यांनी केली. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरजसिंह ठाकूर यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर सोफिटेल हॉटेलच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर हॉटेलच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवरही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.





सत्ताधारी काँग्रेसच्या 8 आणि जेडीएसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आतापर्यंत काँग्रेसच्या 13 आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार धोक्यात आलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांची संख्या सातत्याने घटत आहे.



राज्यात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 आमदारांची आवश्यकता असते. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षांसह एकूण 80 आमदार होते. तर जेडीएसकडे 37 आमदार होते. तसेच त्यांच्याकडे बसपाच्या एका आमदाराचा पाठिंबादेखील आहे. तिन्ही मिळून 118 आमदारांच्या संख्याबळावर जेडीएस-काँग्रेस सत्तेत आले होते.


गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा दिला आहे. सर्व राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले, तर ही संख्या 102 होईल. तर दुसऱ्या बाजुला भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदार आहेत. तसेच एका अपक्षाच्या पाठिंबादेखील आहे. त्यामुळे 106 आमदारांच्या संख्याबळावर भारतीय जनता पक्ष कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे.


संबंधित बातम्या