वसई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसई-विरारमध्ये जाऊन बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला.


इलाका तो कुत्तों का होता है, शेर का नही. हम शेर है, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकूरांवर हल्ला चढवला.

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीनिमित्त मुख्यमंत्र्यांची नालासोपाऱ्याच सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात हितेंद्र ठाकूर यांच्या स्थानिक राजकारणासह शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

यावेळी भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी उपस्थित होते.

इलाका तो कुत्तों का होता है

यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाकूरांवर थेट हल्ला चढवला. मुख्यमंत्री म्हणाले, “मी इकडे येत होतो, तेव्हा मला कोणीतरी विचारलं, देवेनभय्या कुठे निघालात? त्यावेळी मी सांगितलं सभेसाठी वसई-नालासोपाऱ्याला निघालोय. मग मला सांगण्यात आलं त्या भागात, त्या इलाक्यात का जाताय? तो परिसर, तो इलाका तर ‘शिट्टी’चा (बविआचं निवडणूक चिन्ह) आहे.

मी सांगितलं, अरे इलाका तर कुत्र्या-मांजरीचा असतो, आम्ही तर वाघ आहे. वाघ जंगलाचा राजा असतो. त्याच्यासाठी कोणताच इलाका नसतो, पूर्ण जंगलच त्याचा इलाका असतो. वाघ जिथे जाईल तो भाग त्याचा होतो".

आमदार हितेंद्र ठाकूर

शिट्टी वाजवू

यावेळी मुख्यंत्र्यांनी ठाकूरांच्या दादगिरीचा समाचार घेतला. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत.

“आमची शिट्टी नाही वाजली तर तुमची शिट्टी वाजेल, तुमचं पाणी बंद करु, तुम्हाला  बघून घेऊ अशी धमकी दिली जात आहे. मात्र घाबरुन जायचं कारण नाही, मी तुमच्या पाठीशी आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

खिशात नाही, मनात राहतो

इथले काही लोक सांगतात मुख्यमंत्री कोणीही असो, तो आमच्या खिशात असतो. मात्र अजून असा खिसाच तयार झाला नाही, जो देवेंद्र फडणवीसला खिशात ठेऊ शकेल. देवेंद्र फडणवीस एकाच ठिकाणी राहतो, तो म्हणजे लोकांच्या मनात, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शिवसेनेवर टीकास्त्र

यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवरही टीकास्त्र सोडलं.

मुख्यमंत्र्यांनी बहुजन विकास आघाडीचं नाव घेत, एक पक्ष अनधिकृत बांधकामांना पाठिंबा देतो, तर दुसरा पक्ष भगवा झेंडा घेऊन, त्याच लोकांकडून माहिती अधिकार मागवून, खंडणी मागण्याचं काम करतो, असा आरोप केला.

29 गावांचं काय होणार?

यावेळी मुख्यमंत्र्यांनी 29 गावांच्या प्रश्नावर ही उत्तर दिलं. गावकऱ्यांना नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत हवी असेल तर तेच होईल. वसईतील हरीतपट्टा टिकून ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

चिंतामण वनगा भाजपची प्रॉपर्टी

दिवंगत खासदार चिंतामण वनगा ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नसून, ती भाजपाची प्रॉपर्टी आहे, मुख्यमंत्री म्हणाले.

https://twitter.com/abpmajhatv/status/998414367480659968