मुंबई : वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग प्रकल्प, पुणे-मुंबई दृतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेचे बांधकाम आणि सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशीतल्या तिसऱ्या पुलाचं बांधकाम करण्यास मंजुरी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत समितीच्या बैठकीत या परवानग्या देण्यात आल्या. एक महिन्याच्या आत तिन्ही बांधकामांना सुरुवात करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग
वांद्रे ते वर्सोवा हा सागरी सेतू सध्याच्या वांद्रे-वरळी समुद्र सेतूच्या तीन पटीने जास्त लांब असणार आहे. या नवीन सागरी सेतूपासून पश्चिम दृतगती मार्गाला जोडणारी वाहतूक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच वांद्रे बस स्थानकावरुन जोडणारा नवीन रस्ता पश्चिम दृतगती मार्गावरुन (पार्ले जंक्शन) वर्सोवा नाना नानी पार्क येथे सागरी सेतूला जोडणारा रस्ता विकसित करण्यात येणार आहे.
वाशीत तिसऱ्या पुलाचं बांधकाम
ठाणे खाडीवर वाशीत तिसऱ्या पुलाच्या बांधकाम करण्याला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामध्ये वाशीतील टोलनाक्याचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करुन वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.
मुंबई-पुणे दृतगती महामार्गावरील नवीन मार्गिका
खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील नवीन मार्गिकेचे (Missing Link) बांधकाम करण्यात येणार आहे. खालापूर टोलनाक्यापासून कुसगाव (सिंहगड इन्स्टिट्यूट) येथे निघणारा दोन टप्प्यातील बोगद्यांचे आणि त्यांना जोडणाऱ्या आधुनिक पुलाचे बांधकाम करण्याला मंजुरी देण्यात आली.
या प्रकल्पातील दोन बोगद्यांची एकूण लांबी 11 किमी असून दोन डोंगरामधील पुलांची लांबी दोन किमी आहे. देशातील सर्वात मोठा असा 650 मीटरचा केबल स्टेड पूल पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतुकीचे अंतर कमी होऊन वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगराणी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.