मुंबई : ज्यांनी मुंबईतल्या उत्तर भारतीय लोकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही जागा दाखवून दिल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल उत्तर प्रदेश दिवस साजरा झाला, त्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. जेव्हापासून भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुख्यमंत्र्यानी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते. मुंबई फिल्मसिटीचे उपाध्यक्ष इंद्रजित मिश्रा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र आणि उत्तर भारतीय हे भाऊ आहेत. जेव्हापासून आमचं सरकार आलं आहे, तेव्हापासून उत्तर भारतीयांवरील हल्ले थांबले आहेत. असे हल्ले करणाऱ्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आहे, असे फडणवीस म्हणाले.
उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय
फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहे. उत्तर प्रदेशची भूमी वंदनीय अशीच आहे. ती श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची भूमी आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि तिचा विस्तार देशभर झाला. मराठे जसे देशभर विखुरले आहेत. तसेच उत्तर भारतीय देशाच्या काना-कोपऱ्यात पोहचले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकातही उत्तर प्रदेशातून आलेल्या गागा भटांनी मोठी भूमिका बजावली होती. उत्तर प्रदेशचे नागरिकही आता महाराष्ट्राच्या संस्कृतीत दुधात साखर विरघळावी तसेच मिसळून गेले आहेत. त्यांच्या तीन-तीन पिढ्या इथल्याच आहेत. त्यामुळे ते आता मुंबईकर होऊन गेले आहेत, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र अग्रेसर राज्य - योगी आदित्यनाथ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईच्या वाढीत उत्तर प्रदेशवासियांनीही मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्यासाठीचे प्रयत्न आणि पानिपतच्या लढाईतील मराठ्यांचे शौर्य अलौकिकच असे होते. महाराष्ट्राची भूमी संत, थोर राष्ट्रपुरूषांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपला देश सामाजिक समतांचा पुरस्कर्ता आहे. यात महाराष्ट्रातील दूरदृष्टीच्या धुरिणांचे मोठे योगदान आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नागपूरमधील दीक्षाभूमीचा विकास आणि मुंबईतील यथोचित स्मारक उभारण्याचे महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न गौरवास्पदच असे आहेत. महाराष्ट्र शासन लोकाभिमुखता आणि विकास पथावरील अग्रेसर असे राज्य म्हणून राहण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाचे मोठे योगदान असल्याचेही योगी यांनी नमूद केले.
उत्तर भारतीयांवर दादागिरी करणाऱ्यांना आम्ही जागा दाखवली : मुख्यमंत्री फडणवीस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jan 2019 07:10 AM (IST)
उत्तर भारतीयांवरील हल्ले हल्ले थांबले आहेत, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -