मुंबई : मुंबई लोकलचा प्रवास आणि त्यातील गर्दी हा सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. राजकीय नेतेमंडळींचा लोकलशी फारसा संबंध येत नसल्याने त्या त्रासाची जाणीव त्यांना असते का, याबाबत सर्वसामान्यांच्या मनात साशंकता असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी एक किस्सा सांगून लोकल प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.


नगर विकास खात्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या लोकल प्रवासाची आठवण जागी केली. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लोकल ट्रेनमधून प्रवास केल्याचा अनुभव विधानसभेत सांगितला.

'एकदा मी मीरा रोडवरुन मुंबई (सीएसटी) ला येत होतो. प्लॅटफॉर्मवर उभा होतो. ट्रेन आली पण ट्रेन थांबायच्या आतच भरली. खूप लढाई करुन मी ट्रेनमध्ये चढलो. ट्रेनमध्ये दादरपर्यंत खूप गर्दी होती. स्वतःचा हात खाजवायला गेलो तर दुसऱ्याच हात खाजवला जाईल इतकी गर्दी होती. हात-पाय कुठे होता हे कळत नव्हतं' असा किस्सा फडणवीसांनी सांगताच विधानसभेत हास्यकल्लोळ उडाला.

या लोकल प्रवासाची आठवण करुन देतानाच, आता मुंबईकरांची या गर्दीतून सुटका होईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलं. मेट्रो प्रकल्पावर काम सुरु असल्याची माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिली.