Chitra Wagh VIDEO : राष्ट्रवादी सोडताना दादांचा फोन आला, म्हणाले, मी तुमच्यासाठी... ; अजितदादांच्या आठवणीत चित्रा वाघ भावूक
Chitra Wagh On Ajit Pawar : कार्यकर्त्यांवर जीव असलेला नेता म्हणजे अजित पवार, कुटुंब प्रमुख कसा असावा हे अजितदादांच्या रुपानं पाहिलं असं भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या.

मुंबई : वाढदिवसाच्या तारखेची खातरजमा करण्यासाठी अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला होता, पण वाढदिवसादिवशी अजितदादांचा फोन काही आला नाही. त्या आधीच अजितदादा आपल्याला सोडून गेले असं सांगताना भाजप नेत्या चित्रा वाघ भावूक झाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी सोडताना अजितदादांचा फोन आला होता. तुमच्यासोबत काय झालं आहे याची कल्पना आहे, पण मी त्यावेळी काही करू शकला नाही असं अजितदादा म्हणाल्याची आठवण चित्रा वाघ यांनी सांगितली.
आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवारांच्या आठवणी सांगितल्या. कार्यकर्त्यांवर जीव असणारा नेता म्हणजे अजितदादा, कुटुंबप्रमुख कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे दादा, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
भाजपच्या आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, "तीस वर्षे दादांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. अजितदादांची काम करण्याची पद्धत आम्ही पाहिली आहे. कार्यकर्त्यावर अत्यंत जीव असलेला नेता म्हणजे अजितदादा. यवतमाळ ते नागपूरपर्यंत आमचा पायी मोर्चा होता. त्यावेळी कुटुंबाचा प्रमुख कसा असतो हे अजितदादांच्या रुपाने दिसलं."
Chitra Wagh On Ajit Pawar : राष्ट्रवादी सोडताना दादा काय म्हणाले?
चित्रा वाघ म्हणाल्या की, "27 ऑगस्ट 2019 रोजी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी बातम्या सुरू झाल्या, मला अनेक नेत्यांचे फोन आले. मला कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती. मी पवार साहेबांकडे माझा राजीनामा घेऊन जाताना अजितदादांचा फोन आला. तुमच्यासोबत जे झालं त्याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यावेळी मी तुमच्यासाठी काही करू शकलो नाही. मला आता फक्त एवढंच सांगा की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करताय का? त्यावर मी हो म्हणाले. त्यावर तुम्ही देवेंद्र फडणीसांच्या थेट संपर्कात आहात की आणखी कुणी मध्यस्ती आहे असं दादांनी विचारलं. त्यावर मी थेट देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. त्यावर दादांनी मला शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीसांसोबत तितक्याच जोमाने काम कराल असा विश्वास दादांनी व्यक्त केला."
Chitra Wagh Vidhan Parishad Speech : दादांचा फोन आला नाही
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, "अगदी अलिकडे मला अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला. तुमची जन्मतारीख तीच आहे का असं विचारण्यात आलं. 16 तारखेला दादा तुम्हाला फोन करणार आहेत, पण जन्मतारीख तीच आहे का हे कन्फर्म करण्यासाठी फोन केल्याचं सांगण्यात आलं. आता 16 तारीख येऊन गेली, पण दादांचा फोन काही आला नाही."
चित्रा वाघ म्हणाल्या की, "अत्यंत भावनिक असा क्षण आमच्यासाठी आहे. यावेळी सुनेत्राताईंचं अभिनंदन करायचं की त्यांना धीर द्यायचा हे आम्हाला कळत नाही. ज्या परिस्थितीतून त्या पुढे आल्या ते कौतुकास्पद आहे. जेव्हापासून सुनेत्रा ताईंनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार घेतलाय तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना बहीणीप्रमाणे सांभाळलंय."
ही बातमी वाचा:
























