मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्रपुत्र भूषण गवई (Bhushan Gavai) यांनी मुंबईत बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडून करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात विविध मुद्यांवर भाष्य केलं. सत्काराच्या भाषणाच्या समारोपावेळी महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेचे प्रमुख उपस्थित न राहिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर तातडीनं पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेनं भारती मुख्य सचिव सुजाता सौनिक सरन्यायाधीशांच्या भेटीसाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाल्या. सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नितीन जामदार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधान सर्वोच्च असल्याचं भाष्य केलं.
सरन्यायाधीश काय म्हणाले?
महाराष्ट्र राज्याचा एक व्यक्ती सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येत असताना, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना, महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांना तिथं येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार केला पाहिजे. मला प्रोटोकॉलचं बिल्कुल ही काही वाटत नाही. अजूनही अमरावती आणि नागपूरला जात असताना पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला मित्रांच्या दुचाकीवरुन फिरायचो. राज्यघटनेच्या संस्थेचा प्रमुख पहिल्यांदा या राज्यात येत असेल आणि तोही त्या राज्याचा असेल तर जी वागणूक त्यांनी दिली याचा विचार करावा.मला लहान सहान गोष्टीमध्ये पडायचं नाही. आमच्यातील दुसरा कोणी असता तर आर्टिकल 142 चा विचार केला असता. लोकांना कळलं पाहिजे यासाठी उल्लेख केला, असं सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले.
अधिकाऱ्यांची धावाधाव
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या सत्काराला उत्तर देताना नाराजी व्यक्त केल्यानंतर अधिकाऱ्यांची धावाधाव झाली. सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर सरन्यायाधीश दादरच्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी डीजी रश्मी शुक्ला सोबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती सुद्धा चैत्यभूमी मध्ये दाखल होते. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी चैत्यभूमी मध्ये दर्शन घेण्यापूर्वी डीजी रश्मी शुक्ला सोबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सुजाता सैनिक सोबत चर्चा केली.त्या चर्चेवेळी भूषण गवई यांनी नाराजी व्यक्ती केली. यानंतर तिन्ही अधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, चैत्यभूमीवरुन अभिवादन करुन बाहेर पडताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी "जे झालं ते मी कळवल आहे. प्रोटोकॉल बाबत माझी कोणतीही नाराजी नाही" असं म्हटलं.