Bmc Election 2022: महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बृहन्मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या वाढवण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्वरत प्रभाग रचना करण्याच्या राज्य सरकारच्या नव्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेवर बुधवारी तातडीनं सुनावणी घेण्याचं हायकोर्टानं निश्चित केलं आहे.


बृहन्मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांची नव्यानं प्रभाग रचना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांत 9 ने वाढ होऊन ती 236 करण्याचा निर्णय तात्कालीन मविआ सरकारच्या काळात घेण्यात आला. या निर्णयाला कोर्टात यापूर्वीच आव्हान देण्यात आलं होतं. मात्र न्यायालयानं पालिका आणि नगरपालिका निवडणुकीत बहुसदस्सीय प्रभाग पद्धती रचना योग्यच असल्याचा निर्वाळा दिला होता. 


दरम्यानच्या काळात राज्यात राजकीय सत्तांतर झालं. शिवसेनेतून शिंदे गटानं बंड पुकारून भाजपासोबत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. या नव्या सरकारनं मविआ सरकारच्या प्रभागांच्या सीमा रचनेबाबत घेतलेला निर्णय 8 ऑगस्टच्या बैठकीत रद्द करून पालिकेच्या प्रभागांची संख्या 236 वरून पुन्हा 227 करत तसा अध्यादेश जारी केला. या अध्यादेशाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं त्यांना याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिल्यानंतर सोमवारी पेडणेकरांच्यावतीने अ‍ॅड. जोएल कार्लोस यांनी हायकोर्टात न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाच्या निर्देशनास याचिका आणून दिली. त्याची दखल घेत न्यायालयानं यावर सुनावणी बुधावारी निश्चित केली आहे.


दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी जाहीर होणार हा प्रश्न आता सर्वच राजकीय पक्षांसोबत सामान्य नागरिकही विचारू लागेल आहे. यातच यंदा पालिकेची निवडणूक खूपच रंगतदार होण्याचे चिन्ह आहे. 1995 सालापासून पालिकेवर कब्जा असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली असून यात दोन गट निर्माण झाले आहे. यातच ठाकरे गट यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह या निवडणुकीत उतरू शकतो. तर शिंदे गट भाजपसोबत उतरणार आहे. यातच मनसेची भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसत आहे. मनसे भाजप आणि शिंदे गटासोबत मिळून ही निवडणूक लढवणार का, हे देखील पाहावं लागणार आहे.