ठाणे : मध्य रेल्वे (Central Railway) कडून गुरुवार (5 ऑक्टोबर) रोजी प्रसिद्धीपत्रक काढून दोन नवीन ब्लॉकची घोषणा करण्यात आली. वाडी बंदर आणि पनवेल (Panvel) जवळ हे ब्लॉक असतील. मात्र गेल्या आठवड्यात ही ब्लॉकची (Megablock) मालिका सुरू झालेली अजूनही थांबायचे नाव घेत नसल्याने प्रवासी मात्र वैतागून गेले आहेत. त्यात रेल्वे प्रशासनाच्या अनागोंदी कारभरामुळे प्रवाशांच्या त्रासात भर पडली आहे.
मध्य रेल्वेच्या प्रवाशांची साडेसाती संपायचे नाव घेत नाही. गेल्या आठवड्यापासून विविध मोठ्या कामांसाठी मध्य रेल्वेच्या पनवेल स्थानकात मेगाब्लॉक घेण्यात आला. मात्र पायाभूत सुविधांच्या या विकास कामांमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. याची सुरुवात 38 तासांच्या जम्बो मेगाब्लॉकने झाली . सुरुवातीला 38 तासांचा सांगितलेला हा जम्बो मेगाब्लॉक नंतर पाच तासांनी वाढवण्यात आला.
त्यामुळे हार्बर मार्गावर पनवेल ते बेलापूर दरम्यान तब्बल तीन दिवस एकही लोकल धावली नाही. त्याच दुर्दैव म्हणजे त्याच पनवेल स्टेशन जवळ मालगाडी घसरली आणि एक्सप्रेस गाड्यांना देखील त्याचा फटका बसला. सुरुवातीला छोटे वाटणारे हे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे मुंबईहून आणि उत्तर भारतातून कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांच्या प्रवाशांना 15 ते 20 तास ट्रेनमध्येच रखडत बसावे लागले.
नव्या ब्लॉकची घोषणा
रात्र कालीन मेगाब्लॉक आणि यार्ड रीमॉडेलिंग कामामुळे पनवेल जवळ स्पीड रिस्ट्रिक्षन देखील ठेवण्यात आले आहे. यामुळे ट्रान्स हार्बरसह हार्बर मार्गावरील लोकल दिवसभर 30 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच स्टॅब्लिंग लाईनच्या कामासाठी 5 ऑक्टोबरपासून ते 8 ऑक्टोबरपर्यंत पनवेल स्टेशन जवळ आणखीन एका रात्रकालीन मेगाब्लॉकची घोषणा मध्य रेल्वे केली आहे.
कसा असणार नवा ब्लॉक?
हार्बर लाइन बरोबरच आता मध्य रेल्वेवर देखील रात्र कालीन मेगाब्लॉक असणार आहे. वाडीबंदर यार्ड मधील नव्या मार्गीकेसाठी मध्य रेल्वे हा ब्लॉक घेत आहे. 6 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान हा रात्री 11 ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. यामुळे तब्बल 22 एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.तर अनेक एक्सप्रेस या रद्द केल्या गेल्या आहेत. एकाच वेळी सर्व मेगाब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे प्रवासी चांगलेच वैतागले आहेत. मुख्यतः हार्बर लाईन वरचे नवी मुंबई आणि ठाणे परिसरात राहणारे प्रवासी मेटाकुटीला आलेले आहेत. मेगा ब्लॉक घेऊन विकास कामे जरूर करा मात्र त्याचा प्रवाशांना त्रास होणार नाही याचाही विचार करा अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे.
हार्बर मार्गावरील प्रवाश्यांना नाहक त्रास
43 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉक व्यतिरिक्त पनवेल स्थानकात मालगाडी घसरल्याने तब्बल 54 एक्सप्रेस गाड्यांना याचा फटका बसला. जंबो मेगाब्लॉक घेतल्यानंतर 2 ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर पर्यंत रात्रकालीन मेगाब्लॉक ची घोषणा करण्यात आली. या कालावधीत रात्री साडेबारा ते सकाळी साडेपाच वाजेपर्यंत पनवेल स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात आल्या. त्यानंतर तीन ऑक्टोबरला मंगळवारी प्रवासी पनवेल स्टेशनला पोहोचल्यानंतर पुन्हा गोंधळ उडाला. कारण पनवेल स्थानकातील प्लॅटफॉर्म चे नंबर अचानक बदलण्यात आले होते. मात्र याची कोणतीही पूर्वसूचना प्रवाशांना देण्यात आली नव्हती. स्वतः मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना देखील यासंदर्भात माहिती नव्हती.
बुधवारी ट्रान्स हार्बरवर धावणाऱ्या पनवेल लोकल सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ठाणे स्थानकापासून बेलापूरपर्यंत प्रवाशांमध्ये गोंधळ आणि संभ्रमाचे वातावरण दिसून आले. यासंदर्भात देखील कोणतीही माहिती जनसंपर्क विभागाकडून पुरवण्यात आली नव्हती.
रेल्वे प्रशासनाचा चुकीचा निर्णय?
खरंतर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यासारखे प्रकल्प मुंबईतून जाणे पॉझिटिव्ह बातमी होती. मात्र मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे प्रवाशांना याचा प्रचंड त्रास झाला. मालगाडी घसरल्यामुळे कोकणात जाणारे प्रवासी रडकुंडीला आले. तर दुसरीकडे रोजचे मेगाब्लॉक आणि त्यामुळे पनवेल स्थानकातून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकचे वाजलेले बारा यामुळे हार्बर मार्गावरील प्रवासी वैतागले. याचे मुख्य कारण म्हणजे मध्य रेल्वे प्रशासनाचे चुकीचे निर्णय असल्याचं म्हटलं जात आहे.
पनवेल इथे घेण्यात आलेला जम्बो मेगा ब्लॉक खरे तर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर च्या कामासाठी घेण्यात आला होता. त्यात पनवेल स्टेशन जवळ यार्डचे रीमॉडेलिंग देखील करण्यात आले. खरंतर ही दोन्ही कामे प्रवाशांच्या हितासाठी आणि भविष्यात होणाऱ्या फायद्यासाठी घेण्यात आली होती. मात्र मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून प्रचंड घोळ करण्यात आला.