मुंबई : सीबीएसई पेपरफुटी प्रकारानंतर सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'कृष्णकुंज'वर जाऊन विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे आभार मानले.
पेपरफुटी प्रकरणानंतर दहावी गणित आणि बारावी अर्थशास्त्र विषयाचा पेपर पुन्हा एकदा घेण्यात येणार असल्याचं सीबीएसईकडून सांगण्यात आलं होतं. मात्र राज ठाकरे यांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांचं मनोबल वाढवल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
सरकारची चूक असताना विद्यार्थ्यांनी परीक्षा का द्यावी? पुन्हा घेण्यात येणाऱ्या परीक्षेवर देशभरातील विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर दहावी गणिताचा पेपर दिल्ली आणि हरियाणा वगळता देशात इतरत्र कुठेही पुन्हा घेतला जाणार नसल्याचं सीबीएसईकडून सांगण्यात आलं.
तणावात आलेल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आणि त्यासोबतच या प्रकरणी राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानले.