Anil Desai : रविंद्र वायकर, वैभव नाईक, अनिल परब, राजन साळवी यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा आणखी एक मोहरा तपास यंत्रणाच्या रडारावर आला आहे. खासदार अनिल देसाई यांचे खासगी सचिव दिनेश बोभाटे यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. बोभाटे तपास यंत्रणाच्या फेऱ्यात अडकल्यामुळे अनिल देसाई यांच्याही अडचणी वाढू शकतात. 


ईडीकडून आज अनिल देसाई यांचे खासगी सचिव  दिनेश बोभाटे यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. दिनेश बोभाटे यांच्यावर काही दिवसापूर्वीच सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता . त्याआधारावरच आता ईडीने बोभाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांवर एकापाठोपाठ एक तपास यंत्रणाचा फास अधिकच गडद होत आहे. एकीकडे लोकसभा निवडणुका जवळ आल्या आसतानाच दुसऱ्या बाजूला तपास यंत्रणाचा ससेमिरा मागे लागल्यामुळे विरोधकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. 


आरोप काय ?


2 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम बेहिशेबी कमवल्याचा आरोप करण्यात आला आहे.  दिनेश बोभाटे यांच्या विरोधात 17 जानेवारीला मुंबई कार्यालयात गुन्हा दाखल केला होता. आता ईडीकडूनही गुन्हा दाखल केलाय. दिनेश बोभाटे 2013 ते 2023 दरम्यानच्या कालावधीत एका इन्शुरन्स कंपनीत असिस्टंट आणि सिनियर असिस्टंट म्हणून काम करत होते. यादरम्यान त्यांनी संबंधित इन्शुरन्स कंपनीत काम करत असताना जवळपास 36 टक्के बेहिशेबी मालमत्ता कमवल्याचा आरोप  केला आहे.


अजित पवारांवर का कारवाई झाली नाही??


अनिल देसाईंच्या पीएविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधीपक्षातून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. ते म्हणाले की, निवडणूकीच्या तोंडावर या कारवाया सुरु आहेत. अजित पवारांवर का कारवाई झाली नाही?? आदर्श घोटाळ्याचा आदल्या दिवशी उल्लेख केला दुस-या दिवशी राज्यसभा दिली. 165 खासदार हे दुस-या पक्षाचे त्यांपैकी 64 काँग्रेसचे खासदार आहेत. एअर इंडीयाचा एमआरओ नागपूरमध्ये होता, तो कर्नाटकमध्ये पाठवला. केंद्रातील मंत्री असलेल्या गडकरींसमोर नागपूरमधल्या  योजना कर्नाटकात जात आहेत, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.