ठाणे : ठाण्यात एका भरधाव कारनं रस्ता ओलांडणाऱ्या दोघा भावंडांना चिरडलं आहे.  नौपाडा परिसरात वळणावर ही घटना घडली आहे. शाळेतून परतत असताना दोघा भावंडांना कारनं चिरडलं आहे. या दोन्ही भावंडांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

नौपाड्यात दिलीप गुंजल या वाहनचालकानं बेदरकारपणे कार चालवत दोघा भावंडांना चिरडलं आहे. दिलीप गुंजल हा शिक्षक असून आपल्या व्हॅगन आर कारनं काल संध्याकाळी तो घरी परतत होता. नौपाड्यातील एका वळणावर त्यानं पार्थ कोटक आणि जिया कोटक या भावंडांना चिरडलं. दोन्ही भावंडं रस्ता ओलांडताना ही घटना घडली आहे.

दोन्ही जखमी भावंडांना ज्यूपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पार्थची प्रकृती स्थीर असून जियाची प्रकृती गंभीर आहे. मुलांना चिरडल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.