मुंबई : मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची संपत्ती आणि गुन्ह्यांची कुंडली मांडण्याचा अभिनव उपक्रम निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राबवला. मात्र कुंडली मांडताना मुंबईतील एका उमेदवाराच्या बाबतीत घोळ झाल्याची शक्यता आहे. आपल्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना दोन वर्षांची शिक्षा झाल्याचं लिहिल्याचा दावा उमेदवाराने केला आहे.
मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये अपक्ष लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी महाराष्ट्र निवडणूक आयोगावरच ताशेरे ओढले आहेत. कामत यांच्या नावापुढे दोन वर्ष कारावास भोगलेली उमेदवारी अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र ही माहिती पूर्णतः चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
कोणतीही कारवाई झालेली नसताना निवडणूक आयोग आपल्याला गुन्हेगार कसं ठरवू शकतं, असा सवाल कामत यांनी विचारला आहे. संतप्त झालेल्या मीरा कामत यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे, अन्यथा आत्महत्या करण्याचाही इशारा दिला आहे.
आपल्या प्रभागातील निवडणुका रद्द कराव्यात, त्याचप्रमाणे लेखी स्वरुपात माफी मागावी, अशी मागणीही कामत यांनी केली आहे. मात्र 99 टक्के फलकांवरील माहिती योग्य असताना एका चुकीमुळे या पद्धतीला अयोग्य म्हणता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.