मुंबई : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.
बारावीनंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण, बी. फार्म आणि आर्किटेक्ट अशा अभ्यासक्रमांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलं आहे. हे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा संभ्रम होता. त्यामुळे वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना सतावत होती.
मात्र मुदतवाढ दिल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पण विद्यार्थी-पालकांना जात पडताळणी समितीकडे वेळेत अर्ज करण्याचं आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे.