भिवंडी : भिवंडी तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पिलंजे गावातील पूल आणि रस्ता पुन्हा एकदा वाहून गेला. यामुळे पाच आदिवासी पाड्यांवर जाणारा रस्ता बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहे. महत्त्वाचं म्हणजे हा पूल मागील पावसाळ्यातही वाहून गेला होता, जो मार्च-एप्रिल 2019 मध्ये पुन्हा बांधण्यात आला. अवघ्या तीन महिन्यातच पूल पुन्हा कोसळल्याने सरकारी यंत्रणा आदिवासी पाड्यांवरील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत असल्याचं दिसत आहे.

अनगावजवळच्या पिलंजे ग्रामपंचायत हद्दीतील भवरपाडा, बेंदरपाडा, नंबरपाडा, वारणा पाडा, अडगापाडा या आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी, जिल्हा परिषदेने एमएमआरडीएच्या माध्यमातून 80 लाख रुपये खर्च करुन 2018 मध्ये रस्ता आणि काही ठिकाणी पूल बांधले. परंतु इथल्या रस्त्यावरील पूल मागील तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला. तर या रस्त्यावर पाईप टाकलेल्या मोऱ्या दोन ठिकाणी वाहून गेल्याने आदिवासी पाड्यावरील शेकडो नागरिकांचे हाल सुरु आहेत.



रस्त्यावरील पूल आणि रस्ता दोन ते तीन ठिकाणी खचल्याने आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, तसंच रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी आणि रोजगारासाठी अनगाव, भिवंडीकडे जाण्यासाठी सुमारे चार किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत आहे. हे आदिवासी पाडे संकटात असल्याची माहिती पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासन सोबतच लोकप्रतिनधींना नव्हती, हे दुर्दैव

विशेष म्हणजे या रस्त्यावरील हाच पूल आणि काही भाग मागील पावसाळ्यातही वाहून गेला होता. त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव, आमदार शांताराम मोरे , शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी या दुर्घटनेनंतर या ठिकाणी भेट दिली आणि ठेकेदारावर कारवाई करुन रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्च-एप्रिल 2019 मध्ये ठेकेदाराने इथल्या पुलाची दुरुस्ती तो नव्याने बांधला. मात्र अवघ्या तीन महिन्यात तोच पूल पुन्हा वाहून गेला आणि रस्त्यावरील दोन पाईप असलेल्या मोऱ्या वाहून गेल्या. यावरुन जिल्हा परिषद, बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि ठेकेदारांचा हलगर्जीपणा उघड झाला असून नागरिकांनी तीव्र संताप वक्त केला आहे.