Boisar Police : रेल्वेमध्ये नोकरी आणि कामाचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणांना लाखोंचा गंडा घालुन फरार झालेल्या परप्रांतीय बंटी बबली या पती-पत्नीला उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून अटक करण्यात बोईसर पोलिसांना यश आले आहे. राकेश कुमार करन आणि पत्नी सविता करन अशी संशयितांची नावे आहेत.
रेल्वेमध्ये काम करणार्या राकेशकुमार करन याने २०२० साली बोईसर ओसवाल वंडरसिटी येथे कार्यालय सुरू करून रेल्वेमध्ये नोकरी व कामांचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत स्थानिक तरूणांकडून जवळपास १८ ते २० लाख रुपये उकळले होते.चांगल्या सरकारी नोकरीच्या आशेत असलेल्या तरुणांना आरोपीने पश्चिम रेल्वे आणि पालघर पोलिस अधीक्षक कार्यालयाचे बनावट शिक्के यांचा वापर करीत खोटे चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र आणि नोकरीची अपॉईंटमेंट पत्रे दिली होती.मात्र ही अपॉईंटमेंट पत्रे बनावट असल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या तरुणांनी संशयित आरोपी राकेश कुमार करन आणि त्याची पत्नी सविता करन यांना शोधण्याचा प्रतत्न केला असता त्यांनी ऑफीस बंद करून पोबारा केल्याचे उघड झाले होते. या नंतर फसवणूक झालेल्या तरुणांच्या तक्रारीवरून मार्च २०२१ रोजी या पती-पत्नीविरोधात बोईसर पोलिस स्टेशन येथे कलम ४२० आणि ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे दोन्ही बंटी बबली असलेल्या पती-पत्नीने बोईसरप्रमाणेच या आधी दिल्ली,गुजरात आणि बिहार मध्ये देखील नोकरीचे आमिष दाखवत अनेकांना करोडो रूपयांचा गंडा घातला आहे. एका राज्यात फसवणूक करून हे दोन्ही बंटी-बबली दुसर्या राज्यात पलायन करीत असल्याने पोलिसांना देखील त्यांचा माग काढणे कठीण जात होते.मात्र पालघरचे पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक सुरेश कदम व सपोनि सुरेश साळुंके यांच्या नेतृत्वात बोईसर पोलिस स्टेशन चे पीएसआय योगेश खोंडे आणि त्यांच्या टीम ने वर्षभर या प्रकरणाचा अथकपणे तपास करीत उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे लपून बसलेल्या आरोपी राकेश कुमार करन आणि सविता करन या दोन्ही आरोपीना तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करून या दोन्ही आरोपींना बोईसर येथे आणून पालघर न्यायालयात हजर केले असता त्यांना अधिक चौकशीसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बोईसरच्या ग्रामीण भागातील सरकारी नोकरीच्या आशेत असणार्या तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी आणि कंत्राट मिळवून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक झाली होती.याप्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश धोडी यांनी तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपींना अटक व्हावी म्हणून सुरवातीपासून बोईसर पोलिस स्टेशन येथे पाठपुरावा करीत मदत केली होती.तसेच याप्रकरणी सध्याचे पोलिस निरीक्षक सुरेश कदम,सपोनि सुरेश साळुंके आणि पीएसआय योगेश खोंडे आणि त्यांची टीम यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करीत आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे.