Mumbai Parking Issue: अरुंद गल्ल्यांतील पार्किंगवर महापालिकेकडून निर्बंध; मुंबईकरांवर आर्थिक भुर्दंडाची शक्यता
Mumbai Parking Issue: गजबजलेल्या मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आपत्कालीन सेवांना अडथळा ठरत असलेल्या पार्किंगवर आता मुंबई महापालिकेकडून निर्बंध येण्याची शक्यता आहे.

Mumbai Parking Issue: मुंबईतील (Mumbai News) दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये आपत्कालीन सेवांना अडथळा ठरत असलेल्या पार्किंगवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai Mahanagar Palika) अरुंद गल्ल्यांमध्ये पार्किंग नियंत्रित करण्याच्या तयारीत असून लवकरच याबाबत अंमलबजावणी केली जाणार आहे.
दक्षिण मुंबईतील (South Mumbai) चंदनवाडी (Chandanwadi), गिरगाव (Girgaon), काळबादेवी (Kalbadevi), गावदेवी (Gaondevi), ताडदेव (Tardeo), मुंबई सेंट्रल (Mumbai Central), नागपाडा (Nagpada), आग्रीपाडा (Agripada) आणि भायखळा (Byculla) परिसरात 240 हून अधिक अरुंद गल्ल्या आहेत. यापैकी सुमारे 35 ते 40 गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की, तिथून एकावेळी केवळ एकच वाहन जाऊ शकतं. दोन्ही बाजूंना उभ्या वाहनांमुळे अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकांना अडथळा निर्माण होत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.
काळबादेवी आणि झवेरी बाजार (Zaveri Bazaar) परिसरात होलसेल बाजारपेठांमुळे दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती असते. अशा वेळी आग किंवा अन्य आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास अग्निशमन दलाची गाडी किंवा रुग्णवाहिका अडकण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जीवित आणि वित्तहानीचा धोका निर्माण होतो, असं पालिकेचं म्हणणं आहे.
मुंबई महापालिकेच्या प्रस्तावानुसार, काही गल्ल्यांत सम-विषम तारखेनुसार पार्किंगची परवानगी दिली जाईल, तर काही ठिकाणी पूर्ण नो पार्किंग लागू केलं जाईल. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार आहे. मात्र पर्यायी पार्किंगची ठोस व्यवस्था नसल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे. सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा असला, तरी या निर्णयामुळे हजारो वाहनधारकांच्या खिशावर ताण येणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























