मुंबई: एकीकडे कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची ईडीने चौकशी केली असतानाच दुसरीकडे लोकायुक्तांनी मात्र रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मुंबई महापालिकेला क्लिनचीट दिली आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप केला होता. 


कोरोना काळात रेमडेसिवीर खरेदी प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप  किरीट सोमय्या यांनी केला होता. मात्र याच प्रकरणी मुंबई महापालिकेला दिलासा मिळाला आहे. कारण लोकायुक्तांनी यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचं म्हटलं आहे


किरीट सोमय्या यांचे आरोप काय होते?


1) रेमडेसिवीर खरेदी करतानाची पद्धत पारदर्शक नव्हती.
2) छोट्या विक्रेत्यांकडून वाईल्स जास्त दराने खरेदी केल्या.
3) बीएमसी, हाफकीन बायोफार्मास्युटीकल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी खरेदीत भ्रष्टाचार केला.
4) रेमडेसिवीरच्या किमतींमध्ये तफावत पाहायला मिळत आहे. मिरा भाईंदर महापालिकेने ते 658 रुपयांना खरेदी केलं असताना मुंबई महापालिकेने ते 1600 रुपयांना कसं खरेदी केलं?
5) आगामी काळात साथीच्या आजारांच्या बाबत जीवरक्षक आौषध खरेदीबाबत काही नियमन करणार आहे का?


लोकायुक्तांनी दिलेल्या अहवालात रेमडेसिवीर खरेदीप्रकरणात मुंबई महापालिकेला क्लीन चिट दिली आहे.


लोकायुक्तांनी आपल्या अहवालात चार प्रमुख मुद्दे मांडले. 


1) रेमडेसिवीर खरेदी करण्यात पारदर्शक नव्हती असं वाटत नाही.
2) बीएमसी आणि तत्सम प्राधिकरणाने भ्रष्टाचार केला आहे हे सिद्ध होत नाही.
3) किमतींमध्ये तफावत का आली याबाबत पालिकेने दिलेले स्पष्टीकरण योग्य आहे.
4) लोकायुक्त, आणि उपलोकायुक्त अधिनियम 1971 च्या कलम 12(1) अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे.


एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार औषधांच्या कमी-जास्त दाखवण्यात आलेल्या किमतीबाबत महापालिकेने दिलेले उत्तर लोकायुक्तांनी मान्य केल्याचं समोर आलं आहे. कारण  कोरोना काळात अचानक रेमडेसीवीरची मागणी वाढली, त्याप्रमाणात पुरवठा कमी असल्याने वाढीव दराने औषध उपलब्ध करण्याची वेळ पालिकेवर आली होती.


किरीट सोमय्या यांनी मात्र लोकायुक्तांनी महापालिकेला क्लीन चीट दिली नसून उलट ताशेरे ओढल्याचं म्हटलं आहे. शिवाय याची चौकशी करण्याचे आदेश देखील सध्याच्या सरकारला दिल्याचं म्हटंल आहे. कारण कोरोनाकाळात दर नियंत्रित करणं तत्कालीन सरकारचं काम होतं, मात्र तसं झालं नाही असं सोमय्या म्हणाले. 


एकीकडे इक्बाल सिंह चहल यांची वैद्यकीय साहित्य खरेदी प्रकरणात ईडीने चौकशी केली आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकायुक्तांनी जर चौकशी करण्याचे आदेश दिले असतील तर पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार ठाकरे सरकारची चौकशी लावणार का याकडे सर्वांच लक्ष आहे.


ही बातमी वाचा :