मुंबई : महापौर आणि उपमहापौर निवडणुकीनंतर महानगरपालिकेत आता दुसरी महत्त्वाची विशेष सभा सोमवारी पार पडणार आहे. या सभेत सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसेच विविध वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावेही जाहीर केली जाणार आहेत.

Continues below advertisement

नियमांनुसार, सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्याची निवड सभागृहनेतेपदी होते, तर विरोधी पक्षातील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या गटनेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. त्यानुसार सत्ताधारी भारतीय जनता पक्षचे गटनेते गणेश खणकर यांची सभागृहनेते म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तर विरोधी पक्षात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा विरोधी पक्षनेतेपदी होण्याची दाट शक्यता आहे.

दोन्ही पक्षांनी महापौरांकडे अधिकृत पत्र सादर केले असून त्या पत्रांच्या आधारे महापौर सोमवारी या दोन्ही पदांची घोषणा करतील. याच बैठकीत महापालिकेतील चार महत्त्वाच्या वैधानिक समित्यांवरील सदस्यांची नावे जाहीर केली जाणार आहेत. या समित्यांमध्ये स्थायी, शिक्षण, सुधार आणि बेस्ट समितीचा समावेश आहे. 

Continues below advertisement

सदस्यनियुक्तीनंतर येत्या 20 फेब्रुवारी रोजी स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांना महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करावे लागतील.

समितीनिहाय पक्षनिहाय संख्याबळ पुढीलप्रमाणे आहे :

स्थायी समिती (एकूण 26 सदस्य)

भाजप – 10शिवसेना (शिंदे गट) – 4शिवसेना (ठाकरे गट) – 7काँग्रेस – 3मनसे – 1एमआयएम – 1

सुधार समिती (एकूण 26 सदस्य)

भाजप – 10शिवसेना (शिंदे गट) – 4शिवसेना (ठाकरे गट) – 7काँग्रेस – 3मनसे – 1एमआयएम – 1

शिक्षण समिती (एकूण 22 सदस्य)

भाजप – 9शिवसेना (शिंदे गट) – 3शिवसेना (ठाकरे गट) – 6काँग्रेस – 2एमआयएम – 1

बेस्ट समिती (एकूण 16 सदस्य)

भाजप – 6शिवसेना (शिंदे गट) – 2शिवसेना (ठाकरे गट) – 5काँग्रेस – 2एमआयएम – 1

मुंबई महापालिकेच्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असून सभागृहातील सत्तासमीकरण आणि समित्यांवरील वर्चस्व याचा पुढील कामकाजावर थेट परिणाम होणार आहे.

ही बातमी वाचा: