मुंबई : महापालिकेची स्थापना झाल्यापासून सभागृहाची रचना तशीच असल्याने ते सभागृह आता नगरसेवकांना बसण्यासाठी अपुरं पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेचे 227 नगरसेवक, पालिकेचे अधिकारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्या बैठक व्यवस्थेसाठी हे सभागृह अपुरं पडत आहे. त्यामुळे पालिका क्रीडा भवनच्या जागेचा वापर पर्यायी सभागृहासाठी करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. 

मुंबई महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली असून 227 नवनियुक्त नगरसेवक निवडून आले आहेत. त्याचसोबत काही नगरसेवक हे स्वीकृत असणार आहेत. सभागृहाचे कामकाज सुरू असताना त्यावेळी अनेक अधिकारी, कर्मचारीही उपस्थित असतात. तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही उपलब्ध असतात. या सर्वांसाठी आता सध्याचे सभागृह हे अपुरं पडत असल्याचं दिसून येतंय.

महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी पहिली बैठक बोलावण्यात आली त्यावेळी अनेक सदस्यांना बसायला जागा मिळाली नाही. काँग्रेसचे अनेक नगरसेवक हे खाली बसल्याचं दिसून आलं. 

पर्यायी जागेचा मागणी 

मुंबई महापालिका 1872 मध्ये अस्तित्वात आल्यानंतर तिची पहिली सभा 4 सप्टेंबर 1873 रोजी भरली. त्यावेळी नगरसेवकांची संख्या 64 होती. त्यानंतर 2002 पर्यंत त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत ती 227 इतकी झाली. मात्र सभागृह तेच राहिले. नगरसेवकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिका प्रशासनाने नवीन सभागृहाची निर्मिती करणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाही अद्याप करण्यात आलेली नाही.

महापालिका मुख्यालयासमोरील क्रीडा भवन जागेवर महापालिका पर्यायी सभागृह उभारण्याचा विचार केल्यास नगरसेवकांना सभागृहात बसायला पुरेशी जागा उपलब्ध होईल. शिवाय ठिकाण महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे नगरसेवक आणि प्रशासनालाही सोयीचे होईल. सध्या क्रीडा भवनाच्या इमारतीचा पुनर्विकास करून तेथे अत्याधुनिक टाऊन हॉल आणि कॅफे प्रस्तावित आहे .

ही बातमी वाचा: