मुंबई : मुंबई महापालिकेच्या (BMC) विकास निधीच्या वाटपात दुजाभाव झाल्याचा काँग्रेसने (Congress) आणि ठाकरे गटाने आरोप केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात असलेल्या आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, बाकी पक्षातील आमदारांना कुठलाही निधी मिळत नसल्याचं काँग्रेस आणि ठाकरे गटातील नेत्यांचं म्हणणं आहे. याच विरोधात काँग्रेस आणि ठाकरे गट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेचा विकास निधी कशाप्रकारे वाटप करण्यात आला, कोणत्या आमदाराच्या मतदारसंघात किती निधी वाटप झाला, याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.


बीएमसी विकासनिधी वाटपात दुजाभाव झाल्याच्या आरोप


मुंबई महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपुष्टात आला. मुंबई महापालिका आयुक्त हे सध्या पालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका विकास निधी वाटप करताना प्रशासक म्हणून आयुक्तांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने केलाश आहे. नगरसेवक नसल्याने विधानसभानिहाय बीएमसी विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जेव्हा माहितीच्या अधिकारात कुठल्या विधानसभा मतदारसंघात किती निधी मंजूर करण्यात आला. हे जेव्हा समोर आलं, तेव्हा शिंदे आणि भाजपचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात करोडो रुपयांचा निधी मंजूर केल्याचं समजलं.
 
माहितीच्या अधिकारात मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या कुठल्या विधानसभा मतदारसंघात किती निधी वाटप झाला आहे आणि तिथे नेमका कोण आणि कुठल्या पक्षाचा आमदार? आहे हे जाणून घ्या.



  • बोरिवली विधानसभा क्षेत्र : आमदार - भाजप - सुनील राणे -28 कोटी

  • दहिसर विधानसभा क्षेत्र : आमदार भाजप - मनीषा चौधरी - सुमारे 39 कोटी

  • मागाठाणे - शिवसेना - प्रकाश सुर्वे - 25 कोटी

  • मुलुंड - भाजप - मिहीर कोटेचा - 20 कोटी

  • कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर - भाजप - 20 कोटी

  • चारकोप विधानसभा मतदार संघ - योगेश सागर - भाजप - 13.60 कोटी

  • गोरेगाव विधानसभा मतदारसंघ - विद्या ठाकूर - भाजप 28 कोटी

  • वर्सोवा विधानसभा मतदारसंघ - भारती लव्हेकर भाजप - 50 कोटी

  • अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ अमित साटम - भाजप -20 कोटी

  • विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ- पराग अळवणी भाजप - 19 कोटी

  • चांदिवली विधानसभा मतदारसंघ दिलीप मामा लांडे शिवसेना - 23.94 कोटी

  • घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - राम कदम - भाजप 28 कोटी

  • कुर्ला विधानसभा मतदारसंघ - मंगेश कुडाळकर - शिवसेना - 45.84 कोटी

  • वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ आशिष शेलार - भाजप - 24 कोटी

  • मलबार हिल विधानसभा मतदारसंघ मंगल प्रभात लोढा - भाजप - 24 कोटी


पालिकेकडून एकूण 1260 कोटींची तरतूद


पालिकेने या आर्थिक वर्षात प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरता एकूण 35 कोटींची तरतूद केली आहे. एकूण 1260 कोटींची तरतूद 36 विधानसभा मतदार संघाकरता करण्यात आली आहे. विकासकामे करण्यासाठी स्थानिकांकडून आमदारांकडे पत्र प्राप्त होत आहेत. आमदारांनी विकासकामांची पत्रे पालिका आयुक्तांकडे मंजूरीसाठी पाठवली आहेत. मात्र, ही पत्रे मंजूरीसाठी परस्पर पालकमंत्र्यांकडे पाठवावीत, असे उत्तर प्रशासनाने आमदारांना दिले जात आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मुंबई महापालिका 1888 च्या कायद्यानुसार, अशाप्रकारे प्रशासकाला विधानसभानिहाय निधी वाटप करण्याचा कुठलाही अधिकार नसताना प्रशासक आपल्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे आणि याविरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार आहे


विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप


मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात 1260 कोटींची तरतूद केलेली असताना याचा समसमान वाटप नगरसेवक नसताना होणे अपेक्षित होतं. मात्र विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा ज्याप्रकारे आरोप काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून केले जातात आणि न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली जात आहे. त्यामुळे न्यायालय त्या प्रकरणात काय निर्देश देतं हे पाहावं लागेल.