BMC Election 2026 Congress: महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील कोणता पक्ष सर्वांत जास्त शक्तीशाली आहे ते दिसून आलं आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पार्टीने मोठी आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान भक्कम केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असून, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाची ताकद म्हणून पुढे आली आहे. 29 महापालिकांच्या आकडेवारीनुसार भाजपला 910 जागांवर आघाडी मिळाली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला 213, तर काँग्रेसला 171 जागांवर आघाडी दिसून येत आहे. भाजपच्या तुलनेत काँग्रेस बर्‍याच मागे असली, तरी राज्यपातळीवरील एकूण आकडे पाहता ती तिसऱ्या क्रमांकाचा प्रमुख पक्ष ठरली आहे. अशातच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य भाई जगताप यांना पक्षाने काल (शनिवारी, ता १७) कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीबरोबर युती करून लढवली. या निवडणुकीत काँग्रेसला २४ जागांवर विजय मिळवता आला. पक्षाने या निराशाजनक कामगिरीचे खापर वर्षा गायकवाड यांच्यावर फोडत त्यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी भाई जगताप यांनी केली होती. महापालिका निवडणूक निकाल येण्यास २४ तास उलटण्याआधीच भाई जगताप यांनी जाहीरपणे गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सात दिवसांत लेखी खुलासा करावा, असे काँग्रेसचे सचिव आणि मुंबई प्रभारी यू. व्ही. व्यंकटेश यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

ठाण्यात काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून या निवडणुकीत काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे माजी नगरसेवक विक्रांत चव्हाण देखील पराभूत झाले आहेत. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तसेच राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा देखील केली आहे.

पराभवानंतर घेतला निर्णय

ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे ७५, भाजपचे २८, राष्ट्रवादी (शरद पवार) १२, राष्ट्रवादी (अजित पवार) ९, एमआयएम ५, शिवसेना (उबाठा) १, अपक्ष १ असे १३१ नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसचे तसेच महाविकास आघाडीतून निवडणूक लढविणाऱ्या मनसेचा एकही उमेदवार विजयी झालेला नाही. विशेष म्हणजे, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे या दोघांचाही पराभव झाला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये काँग्रेस पक्षाने २२ ते २५ जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, ठाकरे गट आणि मनसेकडून केवळ पाच ते सहा जागा काँग्रेसला देण्यात येत होत्या. हा प्रस्ताव अमान्य करीत काँग्रेसने ९८ ठिकाणी उमेदवार उभे केले होते

मुंबई, पुण्यात काँग्रेसची मर्यादित कामगिरी

काँग्रेसच्या एकूण आकड्यांत मुंबई महानगरपालिकेचा (BMC) वाटा जवळपास नगण्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि शिक्षणाचे केंद्र असलेल्या पुण्यात काँग्रेसला केवळ 5-5 जागांवरच आघाडी मिळाली आहे. पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, उल्हासनगर, नांदेड-वाघाळा, जळगाव, अहिल्यानगर, धुळे आणि कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात काँग्रेस फक्त 2 जागांवर आघाडीवर आहे, तर नवी मुंबईत पक्षाचे खाते उघडलेले नाही.

कुठे चमकली काँग्रेस

मोठ्या शहरांत पिछाडीवर असतानाही काही महापालिकांत काँग्रेसने प्रभावी कामगिरी केली आहे. लातूरमध्ये काँग्रेस 21 वॉर्डांमध्ये आघाडीवर असून सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. अमरावतीत 13 आणि चंद्रपुरात 12 वॉर्डांमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. भिवंडी-निजामपूरमध्येही 12 वॉर्डांसह काँग्रेसने इतर पक्षांना मागे टाकले आहे. याशिवाय नागपूर (22 वॉर्ड), कोल्हापूर (23 वॉर्ड) आणि अकोला (15 वॉर्ड) येथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर मजबूत स्थितीत आहे. एकूणच, या निकालांनी भाजपचे वर्चस्व स्पष्ट केले असले, तरी काँग्रेसची राज्यव्यापी उपस्थिती आणि काही महापालिकांतील कामगिरी आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.