मुंबई : नालेसफाईच्या कामात (Drainage Cleaning) कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना (Contractor) दंड आकारण्यास बीएमसीकडून (BMC) सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत कंत्राटदारांना 54 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शहरी भागातील कंत्राटदारांना सर्वाधिक 31 लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. पावसाळापूर्व कामांचा भाग म्‍हणून मुंबईतील मोठ्या आणि लहान नाल्‍यांमधून गाळ काढण्‍याची कामे पालिकेकडून सुरु आहेत. दरम्यान, नालेसफाईचे काम आकड्यानुसार 100 टक्के पूर्ण झाले असले, तरी संपूर्ण नाल्यातील गाळ काढून तो बाजूला काढणे, हे पालिकेचे उद्दिष्ट असल्याचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केलं आहे. 


नालेसफाईच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना दंड


नालेसफाईच्या कामात कुचराई करणाऱ्या करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेकडून आर्थिक दंड लावला जात आहे. आतापर्यंत कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांना पालिकेकडून 54.68 लाखांचा दंड करण्यात आला आहे. दरवर्षी पालिकेकडून मुंबईतील पर्जन्‍यमान आणि पावसाची तीव्रता याबाबतचा अनुभव लक्षात घेऊन, नाल्‍यांमधून किती गाळ उपसणे आवश्‍यक आहे, याचा अभ्‍यास करून गाळ उपशाचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. यामुळे नाल्‍यांमधून आवश्यक गाळ काढल्‍याने पावसाळी पाण्‍याचा जलद गतीने निचरा होण्‍यास मदत होते. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण 10 लाख 21 हजार 782 मेट्रिक टन गाळ काढण्‍याचे उद्दिष्ट निश्चित करण्‍यात आलं आहे.


बीएमसीकडून कंत्राटदारांना 54 लाख रुपयांचा दंड


दरम्यान, नालेसफाईच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्‍याच्या सूचना पालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. अनेकदा कंत्राटदारांकडून नालेसफाई करून गाळाच्या बाबतीत निष्काळजीपणा दाखवला जात असल्याने अशा कंत्राटदारांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. 31 मे पूर्वी नद्या , नाल्यांतून 10,21,781.92 मेट्रिक टन गाळ काढण्याचे पालिकेचं लक्ष्य आहे. 


विभाग - कंत्राटदारांची संख्या - दंड



  • शहर विभाग - 12 - 31.65 लाख रुपये

  • पूर्व उपनगरे - 10 - 12.55 लाख रुपये 

  • पश्चिम उपनगरे - 09 - 10.48 लाख रुपये 


मुंबईतील नाले



  • छोटे नाले - 1508 (लांबी 605 किमी)

  • मोठे नाले - 309 (लांबी 290 किमी)


पालिकेकडून कारवाईचा बडगा


महापालिकेडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, चेंबरसफाई यांची कामे केली जातात. शहरातील नैर्सगिक नाले, पावसाळी गटारे, भुयारी गटारे, चेंबर, ढापे उघडून स्वच्छ करण्यासासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार निश्चित केले जातात. आतापर्यंत पालिकेकडून नालेसफाईचं काम 100 टक्के पूर्ण झालं आहे. मात्र, कंत्राटदारांकडून नाल्यातील गाळ काढून तो बाजूला काढण्यात कुचराई होत असल्याने पालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


दुकानात अडकलेल्यांची जेसीबीने सुटका करण्याची वेळ; ठेकेदाराचा नागरिकांच्या जीवाशी खेळ