मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला (Veermata Jijabai Bhosale Udyan And Zoo) दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देत असतात. मुंबईकरांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिका देखील पर्यटकांना विशेष सुविधा पुरविण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट देण्यासाठी येणारी लहान मुले, दिव्यांग आणि वृद्धांकरिता बॅटरीवर धावणाऱ्या चार वाहनांची सुविधा महिनाभराच्या आत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे लहान मुले, दिव्यांग आणि वृद्धांना देखील उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात सहजपणे सफर करता येईल.

  


महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उपायुक्त (उद्याने)  किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे विस्तारिकरण, पर्यटकांसाठी नवनवीन आकर्षणे आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी भेट देली. जवळपास 53 एकर परिसरात हे वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय विस्तारले आहे. प्राणिसंग्रहालयातील पक्षी, प्राणी पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यामध्ये लहान मुलांसह वृद्ध व्यक्तींचा देखील समावेश असतो. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती यांना देखील उद्यानाचा संपूर्ण परिसर विनासायास पाहून आनंद घेता यावा यासाठी बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांची व्यवस्था करण्यात येणार आहे.   
  
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपूर्ण प्राणिसंग्रहालयाची पाहणी केली. प्राणिसंग्रहालयातील दिवसेंदिवस वाढणाऱ्या पर्यटकांची व उपक्रमांची माहिती त्यांना देण्यात आली. या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी लहान मुले, दिव्यांग आणि वृद्धांना प्राणिसंग्रहालयात फिरण्याकरिता पर्यावरणपूरक वाहनाची सोय करण्यात यावी, अशा सूचना दिल्या. त्यानुसार वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयास बॅटरीवर धावणाऱ्या आठ आसनी चार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही चारही वाहने उद्यान सुरू असणाऱ्या वेळेत म्हणजे सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 या वेळेत वय 3 ते 12 वर्षांपर्यंतची मुले यांच्यासह वृद्धांकरिता देखील उपलब्ध असणार आहेत. सदर वाहनांची खरेदी करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा नियोजन अधिकारी यांचेकडून निधी हस्तांतरीत केला जाणार आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.   


उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या आधुनिकीकरणाचा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून राबवला जात आहे. उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील नुकतेच विस्तारलेले वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब, क्रॉक ट्रेलमधील मगर आणि सुसरीच्या हालचाली, अस्वल आणि पाणपक्ष्यांचा पिंजरा यासह अनेक गोष्टी पर्यटकांसाठी खास पर्वणी आहेत. पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ, एन्ट्री प्लाझा, तिकिटघर, प्याऊ, प्रसाधनगृह, सोव्हेनिअर शॉप, क्लोक रूम, सीसीटीव्ही कॅमेरा यासह प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर इलेक्ट्रॉनिक प्रवेशयंत्रणा उभारण्यात आली आहे. यामध्ये आता लहान मुले, दिव्यांग व वृद्धांकरिता बॅटरीवर धावणाऱ्या वाहनांची भर पडणार आहे.  


पर्यावरणाला अनुकूल वाहनाची सुविधा


बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जातात. आता देखील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात उपलब्ध करून देण्यात येणारे बॅटरीवर धावणारे वाहन देखील पर्यावरणास अनुकूल असे आहे. कारण त्यातून प्रदूषण होणार नाही. एका वाहनात आठ जणांसाठी आसन व्यवस्था असून अशी चार वाहने महिनाभराच्या कालावधीत वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या वाहन सुविधेच्या शुल्काबाबतचा धोरणात्मक निर्णय अद्याप झालेला नाही.