मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील वायू प्रदूषण नियंत्रणासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली.
दरवर्षीप्रमाणे हिवाळ्यात मुंबई आणि उपनगरात वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनतो. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक आणि नियंत्रणात्मक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान बांधकाम प्रकल्प, सुरू असलेली पायाभूत सुविधा कामे तसेच हवामानातील बदल यांचा वायू गुणवत्तेवर होणारा परिणाम याबाबत सखोल चर्चा झाली. तसेच, प्रदूषणावर प्रभावी नियंत्रणासाठी विभागीय समन्वय वाढवणे, धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना राबवणे आणि वास्तविक वेळेतील निरीक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.