मुंबई: भाजपने मनी आणि मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जिंकली असा हल्लाबोल शिवसेनेने केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाकडे भाजपविरोधात तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे.


जैन मुनींनी भाजपचा प्रचार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. एखाद्या धार्मिक व्यक्तीने अशाप्रकारचा प्रचार करणे म्हणजे हा आचारसंहितेचा भंग आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“मनी आणि मुनी"च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर जिंकलं. भाजपचा हा विजय महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावणारा आहे. जामा मशिदींचे इमाम याआधी असे फतवे काढत होते. तसेच फतवे मिरा-भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी काढले. 'ज्यांनी असे फतवे काढले ते राजकीय गुंड आहेत. त्यांची तुलना मी झाकीर नाईकशी करतो”, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

याशिवाय “हा धार्मिक प्रचार आचारसंहितेचा भंग आहे. या संदर्भात आम्ही केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करत आहोत. अशा धार्मिक गुरुंमुळे कायदा सुवेवस्थेला धोका निर्माण होत आहे. आमच्या प्रत्येक कार्यात जैन समाज सहभागी झालेला आहे. शांतता प्रिय असा हा समाज आहे. मात्र मिरा-भाईंदरमध्ये ज्या प्रकारे जैन मुनींनी गरळ ओकली ती देखील एक प्रकारे हिंसा आहे”, असं राऊत यांनी नमूद केलं.

मांसाहाराला विरोध करणारे हे भाईंदरचे लफंगे उद्या सांगतील की सीमेवरील सैन्याने देखील शाकाहार करावा. अशा लफंग्यांचे ऐकले तर देश बुडेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

आता यापुढे जर कुणी मुनींनी अशाप्रकारे धार्मिक चिथावणीखोर वक्तव्य शिवसेनेसंदर्भात केलं, त्यांची गाठ शिवसेनेशी आहे, असा सज्जड दमही संजय राऊत यांनी दिला.

जैन मुनी काय म्हणाले होते?

"ही निवडणूक आर-पारची लढाई आहे. इथे हिंसा की अहिंसा जिंकणार याचा फैसला तुम्हाला करायचा आहे. तुमचं एक मत पर्युषण काळात हजारो पशूंना जीवदान देईल. तुम्ही मत दिलं नाही तर नवे कत्तलखाने खुले होतील, तुम्ही मत दिलं नाही तर पर्युषण काळात मंदिराबाहेर कोंबड्या शिजवल्या जातील. तुम्ही मत दिलं नाही तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस दुबळे होतील. तुम्ही मत दिलं नाही तर घरोघरी, रस्त्यावर ऑम्लेटच्या गाड्या दिसतील. त्यामुळे माझं तुम्हाला आवाहन आहे, की मिरा भाईंदर पवित्र ठेवण्यासाठी, मिरा भाईंदर गुन्हेगारमुक्त ठेवण्यासाठी भाजपला मत द्या" असं जैन मुनी म्हणाले होते.



मिरा भाईंदरचा निकाल

नुकत्याच झालेल्या मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने 95 पैकी तब्बल 61 जागा जिंकल्या. तर शिवसेना 22 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. याशिवाय काँग्रेस 10 आणि अपक्ष/इतरांना 2 जागांवर विजय मिळाला.

संबंधित बातम्या

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपचं कमळ फुललं


मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : वॉर्डनिहाय निकाल


मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : विजयी उमेदवारांची यादी