मुंबई: मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेनं आपआपला जागावाटपाचा फॉर्म्युला पुढे करायला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये एकमेकांची उणी-दुणी काढण्याची स्पर्धा रंगली आहे.
एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप म्हणजे युती तोडण्याचे संकेत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र युती तोडण्यासाठी, जागा वाटपाचा फॉर्म्युलाच कारणीभूत ठरणार असल्याचं दिसतं आहे.
कारण मुंबई महापालिकेसाठी भाजपला 110 जागा हव्या आहेत. अशी माहिती राजकीय सुत्रांनी दिली आहे. 100 पेक्षा कमी जागा मिळणार असतील तर भाजप युतीसंदर्भात चर्चा करायला देखील तयार नसल्याचं समजतं आहे. तर तिकडे शिवसेना भाजपसाठी 80 जागा सोडायला तयार आहे.
2011च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला 156 जागा आल्या होत्या. त्यापैकी 75 जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला. भाजपनं 71 जागा लढवल्या आणि त्यापैकी 31 जागा जिंकल्या. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपनं सेनेपेक्षा मोठं यश संपादन केलं. त्यामुळं युतीतल्या मोठा भावाची जागा भाजपनं घेतली असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीतल्या जागांसदर्भातला निर्णय खुद्द मुख्यमंत्री घेणार आहेत.
महापालिकेचा आखाडा असो किंवा विधानसभेचं रणांगण, निवडणुकीआधी जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून युती तोडायची आणि निकालनंतर सोयीनुसार पुन्हा जुळवून घ्यायचं. असा ट्रेंडच शिवसेना भाजपन सेट केला आहे. त्याची पुनरावृत्ती यंदाच्या मुंबई महापालिकेत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईत भाजप-सेनेतली युती तुटणारचं अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, ही युती तुटण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला कारणीभूत ठरतो की आणखी काही हे पाहावं लागेल.