शिवसेनेला सतत रडीचा डाव खेळण्याची सवय: माधव भांडारी
एबीपी माझा वेब टीम | 20 Feb 2017 06:24 PM (IST)
मुंबई: प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना मुलाखती देणं हा आचारसंहितेचा भंग आहे. असा आक्षेप घेत शिवसेनेनं आज निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आता याप्रकरणी भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 'शिवसेनेला सतत रडीचा डाव खेळण्याची सवय लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केलेला नाही. ते जे काही करतात त्याची त्यांना जाणीव आहे. तरी सुद्धा शिवसेनेनं तक्रार केली असेल तर त्याची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे.' असं उत्तर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिलं. 'मुख्यमंत्री अनेक वर्षे राजकारणात आहेत, संसदीय कामकाजाचा त्यांना चांगला अनुभवही आहे. पण दररोज भाजपविरोधात 2-3 तक्रारी करणं हा कार्यक्रम सेनेनं राबवला आहे.' असंही म्हणत माधव भांडारींनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'उद्याच्या 'सामना'मध्ये मजकूर असावा म्हणून तक्रार करत असतील. आपल्याला किती जागा मिळतील याचा अंदाज ते बांधू शकत नाही. त्यामुळे पराभवाच्या मानसिकतेत ते गेले आहेत.' अशी टीकाही भांडारींनी केली. संबंधित बातम्या: शिवसेनेची मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, मतदानाआधी नवा वाद