पनवेल महापालिका सभागृहात भाजप कार्यकर्त्याचं बर्थ डे सेलिब्रेशन
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 28 Jul 2018 08:40 PM (IST)
विकासकामांची बोंब असताना पनवेल महापालिकेचे पदाधिकारी भाजप कार्यकर्त्यांचे वाढदिवस चक्क महापालिका सभागृहात साजरे करत आहेत.
नवी मुंबई : नगरसेवक नसलेल्या किंवा महापालिकेशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्तीचा वाढदिवस पनवेल महापालिका सभागृहात साजरा करण्यात आला. महापौर कविता चौतमल आणि सभागृह नेता परेश ठाकूर यांनी हा पराक्रम करुन दाखवला. एकीकडे कामांची बोंब असताना स्थायी समिती सभागृहात भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरा करण्याचे थाट सुरू आहेत. भाजपा युवा मोर्चाचा पदाधिकारी प्रितम म्हात्रे याचा वाढदिवस सभागृहात साजरा करून सभागृहाचे महत्त्व कमी केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. वाढदिवस साजरा करताना भाजपचे नगरसेवक यावेळी उपस्थित होते. यामुळे जनतेची कामं करण्यासाठी असणाऱ्या सभागृहात भाजपा पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस साजरे होत असल्याने पनवेलकर नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे विकासकामांच्या सेलिब्रेशनची पनवेलकरांना अपेक्षा आहे. मात्र याउलट भाजपच्या कार्यकर्त्यांचे वाढदिवस थेट महापालिका सभागृहात साजरे केले जात आहेत.