मुंबई: मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे, यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये, गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane On Uddhav Thackeray ) यांनी केला आहे. तुम्ही अजून सुटला नाही, ईडी तुमच्या मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात तुरुंगात जाणार असा इशाराही त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? असा सवालही त्यांनी विचारला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाचा समाचार घेतला. ते म्हणाले की, "बापाचं धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत. "बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत लढले, यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे विचार मातीत घातले. देशाच्या मोठ्या नेत्यांना गिधाडं म्हणाले, हा लबाड लांडगा आहे. उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही. युतीमध्ये असताना मला मंत्रीपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शाह यांना फोन करत होते. अडीच वर्षात केवळ तीन तासामध्ये हे मंत्रालयात बसले."
अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला?
नारायण राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहेत. त्या आधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत. तुरुंगात असताना संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. उद्धव ठाकरे यांना अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला? अमित शाह हे देशाचे गृहमंत्री, ते कुठेही जातील. उद्धव ठाकरे म्हणाले की अमित शाह यांनी शिवसेनेला जमीन दाखवा असं म्हटलं होतं. त्यांना जमीनीवर या असं म्हणायचं होतं. आता ते आस्मान दाखण्याची भाषा करतात, ते कुणाच्या जीवावार?"
उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा असल्याचं नारायण राणे म्हणाले. ते म्हणाले की, "शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सहा वर्षाचे होते. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते राजकारणात सक्रिय झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटी तरी मारला का? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, थेट मुख्यमंत्री झाले. शिवसेना घडायला, वाढायला, सत्तेवर यायला शिवसैनिकांचा त्याग आहे, यामध्ये उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही. दूध पाजले म्हणता, मग सत्तेत असताना खोक्यांच्या रुपात तूप कोण खाल्लं? यशवंत जाधव यांनी याआधी ते सांगितलं होतं."